माहीम स्थानकाला ‘बाबा मगदुम शाह’ यांचे नाव द्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 03:39 AM2018-08-18T03:39:39+5:302018-08-18T03:40:02+5:30
एल्फिन्स्टन रोडचे नामकरण प्रभादेवी केल्यानंतर आता माहीम रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याची मागणी पुढे आली आहे. येथील प्रसिद्ध ‘बाबा मगदुम शाह’ यांचे नाव माहीम रेल्वे स्थानकाला द्या, नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बहुजन परिषदेचे अध्यक्ष यशवंत गंगावणे यांनी दिला आहे.
मुंबई - एल्फिन्स्टन रोडचे नामकरण प्रभादेवी केल्यानंतर आता माहीम रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याची मागणी पुढे आली आहे. येथील प्रसिद्ध ‘बाबा मगदुम शाह’ यांचे नाव माहीम रेल्वे स्थानकाला द्या, नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बहुजन परिषदेचे अध्यक्ष यशवंत गंगावणे यांनी दिला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत गंगावणे बोलत होते.
ते म्हणाले, ‘केवळ मुंबईच नव्हे, तर महाराष्ट्रासह देशभरातून लोक ‘बाबा मगदुम शाह’च्या दर्ग्यावर येत असतात. मुस्लीम धर्मियांसह इतर धर्म आणि समाजाचे लोकही येथे मोठ्या संख्येने येतात. परिणामी, येथील मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गासह पश्चिम रेल्वेच्या माहीम स्थानकाचे नामकरण ‘बाबा मगदुम शाह’ करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. याशिवाय येथील मेट्रो स्थानकालाही ‘बाबा मगदुम शाह’ यांचे नाव देण्याची संघटनेची मागणी आहे. अन्यथा दोन्ही मार्गांवर स्थानिकांमार्फत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गंगावणे यांनी दिला आहे.
सनातनवर बंदी घाला
एटीएसने सनातन, शिवशाही प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना बॉम्ब बाळगल्याच्या प्रकरणात संशयित म्हणून अटक केली आहे. घातपात घडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या या संघटनांवर बंदी घालण्याची मागणीही बहुजन परिषदेने केली आहे, तसेच संविधान जाळण्याचा निषेध करत संबंधितांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.