मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या; मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 03:09 AM2019-12-25T03:09:12+5:302019-12-25T03:09:54+5:30
पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात ठाकरे म्हणतात, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत महाराष्ट्र
मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा यासाठी तातडीने आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागास द्यावेत, अशी विनंती करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे.
पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात ठाकरे म्हणतात, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या तज्ञ समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे केंद्र सरकारकडे १६ नोव्हेंबर २०१३ रोजी प्रस्ताव सादर करण्यात आला. अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक निकष मराठी भाषा पुर्ण करते. अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत अनेकदा पाठपुरावा करूनही हे प्रकरण केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडे प्रलंबित आहे.
संबंधित विभागाने सदर प्रकरण साहित्य अकादमीच्या भाषा समितीकडे विचारार्थ असल्याचे कळविले आहे. बराच कालावधीपासून हे प्रकरण प्रलंबित असल्याने पंतप्रधानांनी स्वत: लक्ष घालून मराठीला तातडीने अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, असे ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.