‘६ लाख द्या, २ महिन्यांत रेल्वेत नोकरीला लावतो’ ; बनावट भरतीप्रकरणी आरोपीला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 06:11 AM2023-12-15T06:11:45+5:302023-12-15T06:11:59+5:30
रेल्वेत बोगस भरती करणाऱ्या टोळीच्या पर्दाफाश करण्यात रेल्वेच्या दक्षता विभागाला यश आले असून, या रॅकेटमध्ये आरोपींना धरपकड केली आहे.
मुंबई : रेल्वेत बोगस भरती करणाऱ्या टोळीच्या पर्दाफाश करण्यात रेल्वेच्या दक्षता विभागाला यश आले असून, या रॅकेटमध्ये आरोपींना धरपकड केली आहे.
आरोपी नरसिंह पै यांच्याबद्दल लेखी तक्रार प्राप्त झाली होती. पै यांनी त्यांचा रेल्वेमध्ये संपर्क आहे आणि सहा लाख रुपयांची इच्छित रक्कम प्रदान केल्यानंतर २ महिन्यांच्या आत नोकरी देईन, असे सांगितले होते. त्यांनी तक्रारदारास घाटकोपर स्टेशन येथे भेटून सोबत एक लाख रुपयांचा पहिला हप्ता देण्यासही सांगितले.
तक्रारदाराच्या माहितीवरून मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने ही तक्रार खरी असल्याची पडताळणी केली. त्यानुसार मुख्य दक्षता अधिकारी आणि निरीक्षकांच्या पथकाने २५ हजार रुपयांच्या चलनासह रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांचा घाटकोपर स्टेशनवर बनावट हँडलरला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला.
आरोपी नरसिंह पै याला २५ हजार रुपयांची लाच रकमेसह रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्या ताब्यात सापडलेली रक्कम सापळ्यासाठी दिलेल्या चलनाशी जुळली, जप्त केलेली रक्कम आणि नोटांची संख्या सारखीच होती, याची पक्की खात्री दक्षता पथकाने केली.