Join us

औषधे, रक्तचाचणी सुविधा रुग्णालयातच द्या, ‘जेजे’तील डॉ. भंडारवार समितीचे निर्देश, डॉक्टरांनाही तंबी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 3:49 PM

यापूर्वी रुग्णालयाबाहेर बाहेरून सुविधा घेण्यास सांगणाऱ्या डॉक्टरांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला होता.

मुंबई : रुग्णालयात औषधे, सर्जिकल मटेरियल्स, रक्तचाचण्या उपलब्ध असतानाही जे. जे. रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांना बाहेरून या गोष्टी विकत घेण्यासाठी आणि चाचण्या करून घेण्यासाठी डॉक्टर चिठ्ठ्या लिहून देत होते. यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाला तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जनरल सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. अजय भंडारवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली होती. त्या समितीने रुग्णालय प्रशासनाने सर्व औषधे आणि रक्तचाचण्या रुग्णालयातच उपलब्ध करून द्याव्यात, असे अहवालात म्हटले आहे.

यापूर्वी रुग्णालयाबाहेर बाहेरून सुविधा घेण्यास सांगणाऱ्या डॉक्टरांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला होता. अशा डॉक्टरांवर कोणती कारवाई असावी, हे निश्चित करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने डॉ. भंडारवार यांच्या अध्यक्षतेखाली प्राध्यापक आणि निवासी डॉक्टर प्रतिनिधींची संयुक्त समिती स्थापन केली होती. या समितीत आठ सदस्य असून त्यात चार अध्यापक आणि चार मार्ड सदस्य यांचा समावेश होता. त्या समितीने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात रुग्णालय प्रशासनाला अहवाल सादर केला आहे.

अहवालात अजून कोणते निर्देश ? - या अहवालात निवासी डॉक्टरने किंवा एखाद्या अध्यापकाने सुविधा रुग्णालयाबाहेरून घेण्यास सांगितले, तर त्या संबंधित डॉक्टरने कोणत्या परिस्थितीमध्ये हा निर्णय घेतला आहे, त्याचे स्पष्टीकरण घ्यावे. 

- याबाबत डॉक्टरचे उत्तर समाधानकारक नसल्यास  त्याच्याविरोधात पाच तज्ज्ञ डॉक्टरांची समिती नेमून चौकशी करावी. तसेच सर्व संमतीने कारवाईबाबत निर्णय घ्यावा. - प्रशासनाने रुग्णालयातील रक्तचाचणीची मध्यवर्ती प्रयोगशाळा २४ तास कार्यरत ठेवून सर्व पद्धतीच्या चाचण्या या ठिकाणीच कराव्यात. अतितत्काळप्रसंगी रक्ताची चाचणीसुद्धा याच ठिकाणी उपलब्ध करून द्यावी. 

टॅग्स :हॉस्पिटलडॉक्टर