मुंबई : शिक्षणाचे खासगीकरण, शाळांचे कंपनीकरण थांबवावे तसेच शिशु ते पदव्युत्तर शिक्षण मोफत मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने मंगळवारी, २७ मार्चला एक दिवसीय ठिय्या आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून एक कोटी सह्यांचे निवेदन जमा करून ते मुख्यमंत्र्यांना देणार असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष भगवानराव साळुंखे यांनी दिली.
शिक्षक परिषदेचे प्रांताध्यक्ष वेणूनाथ कडू, सरकार्यवाह नरेंद्र वातकर, कोषाध्यक्ष किरण भावठणकर, आमदार नागो गाणार, संजीवनी रायकर, मुंबई विभागाचे शिक्षक परिषदेचे उमेदवार अनिल बोरनारे व राज्यातील सर्व विभागातील शिक्षक परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते या आंदोलनात सामील होतील.
शिक्षण क्षेत्रात स्वयंअर्थ सहाय्य शाळांचा कायदा आला आणि अनुदानित शाळांवर कुºहाडच कोसळली आहे. शेकडो मराठी शाळा बंद पडत असून हजारो शिक्षक अतिरिक्त होत आहेत. खाजगी शाळांना दिलेल्या परवानग्यांमुळे सामान्य पालक वाढीव शुल्काला बळी पडत असून त्यात आता शाळांचे कंपनीकरण करण्याचा डाव खेळला जात आहे. त्यामुळे अनुदानित शाळांवर त्याचा परिणाम होणार असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले. म्हणूनच ‘शिक्षण वाचवा’ जन आंदोलनाला मुंबईसह राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर, मुख्याध्यापक, संस्थाचालक व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.