Join us

'मिठागरांचे भूखंड कामगारांच्या घरासाठी द्या'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 1:56 AM

सर्व श्रमिक संघटनेची मागणी; आंदोलनाचा इशारा

मुंबई : मुंबईतील मिठागरांच्या जमिनी प्राधान्याने गिरणी कामगार आणि वारसदारांच्या पुनर्वसनासाठी उपलब्ध करा अशी मागणी सर्व श्रमिक संघटनेने केली आहे़ या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी २७ जूनला सकाळी ११.०० वाजता आझाद मैदान येथे एकत्र येऊन विधीमंडळ अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले.मुंबईतील मिठागराच्या जमिनी २०३४ च्या आराखड्यानुसार परवडणाऱ्या घरांसाठी विकासकांना दिल्याचे सुतोवाच आहेत. सुमारे १ हजार ६१७ एकर जमिन नव्या विकास आराखड्यानुसार घरांसाठी उपलब्ध होईल. या जमिनीतील काही हिस्सा मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांसहीत पुनर्वसन करण्याकरीता उपलब्ध करावा अशी मागणी सर्व श्रमिक संघटनेनी केली आहे. अशाप्रकारे उपलब्ध होणाºया जमिनी गिरणी कामगारांनी स्वयं विकासामार्फत स्वत:ची घरे बांधण्यासाठी स्थापन केलेल्या नियोजित हौसिंग सोसायटींना देण्यात याव्या या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे संघटनेने सांगितले.गिरण्यांच्या जमिनीवर गिरणी कामगारांचा कायदेशीर हक्क असताना बहुतांश जमिनी सरकारने गिरणी मालकांच्या घशात घातल्या आहेत. संघटनेने आणि समन्वय समितीने मुंबई शहर आणि उपनगरातील मिठागरे, अन्य मार्गाने उपलब्ध होणाºया जमिनी विकासकांना न देता त्यातील काही हिस्सा गिरणी कामगारांसाठी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे. अशा जमिनींवर स्वयं विकासकाच्या मार्गे गिरणी कामगार आणि त्यांचे वारस घरे बांधतील, यासाठी त्यांनी स्थापन केलेल्या सोसायटीना सरकारने सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशीही मागणी सर्व श्रमिक संघटनेने केली़