Join us  

‘मुंबईत कार्यरत’ शिक्षकांना मुंबईतच मतदानाचा अधिकार द्या, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 11:02 AM

मुंबईत कार्यरत असलेल्या सर्व शिक्षकांना मुंबईतच मतदानाचा हक्क द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेने केली आहे.

मुंबई : मुंबईत कार्यरत असूनही वास्तव्य नसल्याने बहुसंख्य शिक्षकांना मुंबई शिक्षक आमदार निवडणुकीत मतदानापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे मुंबईत कार्यरत असलेल्या सर्व शिक्षकांना मुंबईतच मतदानाचा हक्क द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेने केली आहे.

निवडणूक आयोगाने ज्या शिक्षकांचा वास्तव्याचा पुरावा मुंबईतील आहे, अशा शिक्षकांना मुंबई शिक्षक मतदारसंघात मतदान करण्यास परवानगी दिलेली आहे; मात्र मुंबईत कार्यरत शिक्षकांपैकी ६० ते ७० टक्के शिक्षक हे ठाणे, कल्याण, डोंबिवली, विरार, नालासोपारा, वसई, पालघर, रायगड येथे राहतात.

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मुंबईत कार्यरत असूनही वास्तव्य मुंबईबाहेर असल्याने बहुसंख्य शिक्षकांना मुंबई शिक्षक आमदार निवडणुकीत मतदानापासून वंचित राहावे लागते.

संघटनेचे म्हणणे...मुंबईत कार्यरत असूनही फक्त मुंबईत वास्तव्य नसल्याने शिक्षक आमदार निवडून देता येत नाही. हा शिक्षकांवरील अन्याय आहे; किंबहुना लोकशाहीला घातक असल्याचा आरोप संघटनेचे माध्यमिक विभागप्रमुख संजय केवटे यांनी केला आहे. त्यामुळे जे शिक्षक मुंबईतील माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत आहेत, अशा सर्व शिक्षकांना मुंबई शिक्षक मतदारसंघात मतदान करण्यास परवानगी देण्यात यावी, तसेच मतदार म्हणून नोंदणी करताना वास्तव्याचा निकष न ठेवता मुंबईत कार्यरत असल्याचा निकष लावावा.

टॅग्स :मतदान