ब्रॅण्डेडसोबत जेनेरिक औषधांचीही नावे द्या, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे परिपत्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 11:39 PM2017-11-25T23:39:46+5:302017-11-25T23:42:48+5:30
रुग्णांना औषधांचे प्रिस्क्रिप्शन देताना ब्रॅण्डेड औषधांबरोबरच त्यांची जेनेरिक नावे द्यावीत; आणि विशेष म्हणजे ही चिठ्ठी सुवाच्य अक्षरात असावी, असे परिपत्रक महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने काढले आहे.
मुंबई : रुग्णांना औषधांचे प्रिस्क्रिप्शन देताना ब्रॅण्डेड औषधांबरोबरच त्यांची जेनेरिक नावे द्यावीत; आणि विशेष म्हणजे ही चिठ्ठी सुवाच्य अक्षरात असावी, असे परिपत्रक महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने काढले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, डॉक्टरांनी रुग्णांना जेनेरिक औषधेच लिहून द्यावीत यासाठी कायदा करणार असल्याची घोषणा केली होती. याच घोषणेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या नव्या कार्यकारिणीने हे परिपत्रक काढले आहे.
या परिपत्रकाविषयी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या संकेतस्थळावर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, सर्व नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांना याविषयी पत्रक पाठविण्यात आले आहे. याशिवाय हे प्रिस्क्रिप्शन कॅपिटल अक्षरात लिहिण्यास सांगितले आहे, असे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे प्रबंधक दिलीप वांगे यांनी सांगितले.
आजारापेक्षाही त्यावर उपचारासाठी होणाºया खर्चाचा रुग्णांना हल्ली विचार करावा लागतो. डॉक्टर केवळ ब्रॅण्डेड औषधे घेण्याचाच सल्ला रुग्णांना देतात, हा सार्वत्रिक अनुभव आहे. त्यामुळे डॉक्टर सांगतील तीच औषधे खरेदी केली जातात. या दोन्ही औषधांच्या किमतींत प्रचंड तफावत आहे.
तरीही डॉक्टर जेनेरिकला प्राधान्य का देत नाहीत, असा प्रश्न उपस्थित
होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे
जेनेरिक औषधांना प्राधान्य देण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने हे परिपत्रक काढले आहे. यापूर्वी मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियानेही डॉक्टरांना जेनेरिक औषधांविषयीचे पत्रक पाठविले होते.