मुंबई : दिवाळी नंतर लगेचच दि. 20 व 21 ला येणा-या छटपूजा कार्यक्रमासाठी कोविडच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक तत्वे निश्चित करुन नियम व अटींच्या अधिन राहून छटपूजेसाठी परवानगी द्यावी अशी आग्रहीमागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. पालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांची भेट घेऊन लेखी पत्राद्वारे सदर मागणी करण्यात आली.
मुंबई शहरात मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीय नागरिक वास्तव्य करतात. उत्तर भारतात दिवाळी नंतर लगेचच छटपूजा या धार्मिक विधीचे आयोजन मोठ्या प्रमाणावर केले जाते. गेले कित्येक वर्षे मुंबई शहरात सुद्धा छटपूजेचे आयोजन विविध ठिकाणी केले जात आहे. दरवर्षी या कार्यक्रमास मुंबई महानगरपालिका आवश्यक परवानगी देत असते. मात्र या वर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. साधारणत: आज मितिस 100 लोकांपर्यंत कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य शासनाने परवानगी दिलेली आहे. गणपती विसर्जन आणि नवरात्रौत्सवात दुर्गामाता विसर्जन यासाठी कृत्रिम तलाव / हौद महापालिकेच्या विविध उद्यानांमध्ये उभारण्यात आलेले होते. त्याच धर्तीवर छट पूजेसाठी छोटास कृत्रिम तलाव / हौद महापालिकेच्या अखत्यारितील जागेवर उभारुन त्यावर एकावेळी 100 पेक्षा कमी लोकांना कोविड खबरदारीचे सर्व नियम पाळून, मास्क लावून, सामाजिक अंतर चे ध्यान ठेवून छटपुजा करण्याची परवानगी देण्यासाठी आवश्यक ती मार्गदर्शक तत्वे तयार करावीत व तत्संबधीचे आदेश विभागीय सहाय्यक आयुक्तांना द्यावेत अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली.
यावेळी आमदार मिहिर कोटेचा, भाजपा उत्तर भारतीय मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय पांडे, छटपूजा आयोजक अमरजित मिश्रा, बृहन्मुंबई महानगरपालिका पक्षनेते विनोद मिश्रा, भाजपा प्रवक्ते भालचंद्र शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी छटपूजेसाठी आवश्यक मार्गदर्शक तत्वे दोन दिवसात निश्चित करण्याचे व तश्या सूचना सर्व विभागीय सहाय्यक आयुक्तांना देण्याचे आश्वासन दिले अशी माहिती भालचंद्र शिरसाट यांनी दिली.