राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांच्या दुसऱ्या डोसला प्राधान्य द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:07 AM2021-07-27T04:07:04+5:302021-07-27T04:07:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात १८ ते ४४ वयोगटातील लोकांचे लसीकरण १ मे रोजी सुरू झाले. त्याप्रमाणे कोविशिल्ड ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात १८ ते ४४ वयोगटातील लोकांचे लसीकरण १ मे रोजी सुरू झाले. त्याप्रमाणे कोविशिल्ड घेणाऱ्यांचा ८४ दिवसांचा कालावधी २४ जुलै रोजी पार पडला आहे. या पार्श्वभूमीवर, राज्याच्या आरोग्य विभागाने जिल्हा आणि स्थानिक प्रशासनाला राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांच्या दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ९५ लाख लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. याविषयी, आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले, आरोग्य विभागाने सर्व वयोगटातील लोकांच्या दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्याचा निर्णय जिल्हा आणि तालुका पातळीवरील प्रशासनाला कळविला आहे.
लसींचे मिळालेल्या डोसचे वर्गीकरण कशा स्वरूपात केले जावे, याचा संपूर्ण अधिकार स्थानिक प्रशासनाचा असल्याची माहिती मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे. सध्या मुंबई पालिकेने ६० टक्के लसींचा साठा दुसऱ्या डोसकरिता तर ४० टक्के लसींचा साठा पहिल्या डोससाठी राखीव ठेवला आहे. मुंबईत १८ ते ४४ वयोगटातील २२.३ लाख जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर ७५ हजार जणांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. कोव्हॅक्सिन लस घेतलेल्यांना २८ दिवसांनी दुसरा डोस मिळत आहे.