मुंबई : महाराष्ट्रातील असंख्य मुले दरवर्षी उच्च शिक्षणासाठी परदेशात जातात. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या विद्यार्थ्यांनी आपापल्या विद्यापीठात पोहोचणे अपेक्षित असते. यंदा अनेक विद्यापीठांनी लसीकरण पूर्ण करण्याची अट टाकली आहे. त्यामुळे लस नियमांनुसार अशा सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याची मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
सध्या देशातील लसीकरणात कोविशिल्डच्या दोन डोसमध्ये १२ ते १६ आठवड्यांचे अंतर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यापूर्वी फक्त एकच डोस मिळण्याची शक्यता आहे. तसेच अनेक देशांमध्ये कोविशिल्ड ही लस नसल्याने या मुलांचे लसीकरण पूर्ण होणार नाही. यावर उपाय म्हणून ज्या विद्यार्थ्यांना व्हिसा मिळाला आहे त्यांचा एक वेगळा गट तयारकरून प्राधान्याने पहिला डोस द्यावा. तसेच परदेशात असलेल्या संपूर्ण लसीकरणाच्या व्याख्येनुसार दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण होणे आवश्यक असल्याने या विद्यार्थ्यांना ऑगस्टमध्ये परदेशात जाण्यापूर्वी दुसरा डोस जुलै महिन्यात देण्यात यावा. म्हणजे त्यांचे परदेशातील नियमांनुसार लसीकरण पूर्ण होईल, असे नांदगावकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
परदेशात जाणारे विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी खूप कष्ट घेतात. विविध परीक्षा देऊन आपला वेळ व पैसा खर्च करून शिक्षणासाठी परदेशात प्रवेश मिळवतात. अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी कर्जही काढलेली आहेत. गेल्या वर्षीदेखील अनेक विद्यार्थी पदेशात जाऊ शकलेले नाहीत. महाराष्ट्र शासनाने परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या या अडचणींचा प्राधान्याने विचार करून या विद्यार्थ्यांचे प्राधान्याने लसीकरणाचे दोन्ही डोस जुलै महिन्यात पूर्ण करून त्यांना दिलासा द्यावा, अशी विनंती नांदगावकर यांनी पत्राद्वारे केली आहे.