बंद शिधावाटप पत्रिका सुरू करून दिलासा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 01:53 AM2021-04-24T01:53:06+5:302021-04-24T01:53:13+5:30
आमदार सुनील प्रभू यांनी गरजूंसाठी केली मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या वर्षी कोरोना टाळेबंदी काळात अंधेरी ते कांदिवली परिमंडळातील दारिद्र्य रेषेखालील बंद झालेल्या शिधावाटप पत्रिका परत सुरू करून गरजू कुटुंबांना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद, आमदार,माजी महापौर सुनील प्रभू यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना केली आहे.
याप्रकरणी शिवसेनेच्या नगरसेविका विनया विष्णू सावंत यांनी आमदार सुनील प्रभू यांना निवेदन देऊन लक्ष घालण्याची विनंती केली होती. गेल्या टाळेबंदी काळात अनेक दारिद्र्य रेषेखालील शिधावाटप धारक कुटुंब गावी गेले होते. टाळेबंदीचा कालावधी मोठा असल्याने मुंबईतील त्यांच्या घरात कोणी सदस्य नसल्याने त्यांची घरे बंद होती.
त्यानंतर परत सदर कुटुंब मुंबईत परत आल्यानंतर दारिद्र्य रेषेखालील मिळणारी धान्याची सुविधा बंद झाल्याचे त्यांना समजले. त्यामुळे धान्यापासून वंचित झालेल्या या कुटुंबासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.
त्यामुळे धान्यापासून वंचित झालेल्या या कुटुंबांना पुन्हा या सुविधेचा लाभ मिळण्यासाठी अंधेरी ते कांदिवली परिमंडळातील रद्द झालेल्या दारिद्र्य रेषेखालील शिधावाटप पत्रिका धारकांची नावे पुन्हा कोरोना पूर्वीच्या सदर मूळ योजनेत समाविष्ट करून त्यांना पुन्हा धान्य पूरवठा करणे गरजेचे आहे. यासाठी जातीने लक्ष घालून संबंधितांना आदेश द्यावेत अशी विनंती आमदार सुनील प्रभू यांनी मंत्रीमहोदयांना केली आहे.
याप्रकरणी आपण मंत्री छगन भुजबळ यांच्याशी बोललो असून याप्रकरणी माहिती घेऊन कार्यवाही करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देतो असे आश्वासन त्यांनी दिल्याचे आमदार प्रभू यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
‘धान्यापासून राहिलेत वंचित’
गेल्या टाळेबंदीचा कालावधी मोठा असल्याने मुंबईतील शिधावाटप धारक यांच्या घरात कोणी सदस्य नसल्याने त्यांची घरे बंद होती. त्यानंतर परत सदर कुटुंब मुंबईत परत आल्यानंतर दारिद्र्य रेषेखालील मिळणारी धान्याची सुविधा बंद झाल्याचे त्यांना समजले. त्यामुळे धान्यापासून वंचित झालेल्या या कुटुंबासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.