Join us

वटहुकूम काढून मराठा, धनगरांना आरक्षण द्या; उद्धव ठाकरेंचे केंद्र सरकारला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2023 7:22 AM

रंगशारदा सभागृहात आयोजित केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ठाकरे बोलत होते.

मुंबई : दिल्ली सरकारच्या अधिकाराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय मनाविरोधात गेला म्हणून  सरकारने तोच निर्णय संसदेत बहुमताच्या आधारे फिरवून दिल्लीवर कब्जा मिळविला. अगदी त्याचप्रमाणे संसदेने बोलाविलेल्या विशेष अधिवेशनात मराठा, धनगरांना आरक्षण मिळवून द्या, असे आव्हान शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिले.

रंगशारदा सभागृहात आयोजित केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, हिंदूंच्या उत्सवामध्ये गणेशोत्सवामध्ये तुम्ही नेमके अधिवेशन कसे बोलावता. यामागे तुमचे नेमके काय अडले आहे? ज्योतिषी आणले कुठून?  हुकूमशाही चिरडून टाकण्यासाठी इंडिया म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत. तेव्हा देशरक्षणासाठी सोबत मेहबुबा मुफ्तीही आल्या तरी सोबत घेऊ.

भाजपवर टीका

बाळासाहेबांनी काँग्रेसला विरोध केला होता असे पोस्टर त्यांनी (शिंदे गट) लावले.  अरे, बाळासाहेबांनी विरोध केला होता. परंतु, बाळासाहेबांनी कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी शिवसेना काढली नव्हती. मी कमळाबाई हा शब्द मुद्दाम वापरला कारण तो बाळासाहेबांचा शब्द आहे, असे म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली.

भाजपने डिसेंबरमध्ये सगळी विमाने आणि हेलिकॉप्टर बुक केली आहेत. जर तेव्हा निवडणुका झाल्या तर काय? असा इंडियाच्या बैठकीत काहींनी प्रश्न केला. मी म्हटले, होऊ दे, स्वातंत्र्याच्या लढ्यावेळी हेलिकॉप्टर आणि विमाने नव्हती, तेव्हा सामान्य माणूस रस्त्यावर उतरला आणि त्याने ब्रिटिशांना देशातून हाकलून लावले, असेही ठाकरे म्हणाले.

टॅग्स :उद्धव ठाकरेमराठा आरक्षण