"ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या"; उद्धव ठाकरेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 04:50 PM2023-10-29T16:50:44+5:302023-10-29T16:52:32+5:30

मनोज जरांगे-पाटील यांची तब्येत खालावत आहे. सरकार त्यांच्या जीवाशी खेळण्याचे राजकारण करीत असेल तर महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेला ते चुड लावीत आहेत.

"Give reservation to OBCs without jeopardizing them to maratha samaj"; Uddhav Thackeray's demand | "ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या"; उद्धव ठाकरेंची मागणी

"ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या"; उद्धव ठाकरेंची मागणी

मुंबई : मराठाआरक्षणासाठी अन्न-पाणी त्याग करून आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती रविवारी चांगलीच खालावली आहे. जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाच्या पहिल्या दिवसापासूनच उपचार घेण्यास नकार दिला आहे. मला बोलता येते तोपर्यंत तुम्ही चर्चेला या, आरक्षण द्यायचे की नाही ते सांगा, असेही जरांगे पाटील म्हणाले. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रसिद्धी पत्रकातून भूमिका मांडली आहे. तसेच, कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, असे म्हणत आरक्षणाच्या मुद्द्यावरुन केंद्र आणि राज्य सरकारवरही जबरी टीका केली आहे. 

मनोज जरांगे-पाटील यांची तब्येत खालावत आहे. सरकार त्यांच्या जीवाशी खेळण्याचे राजकारण करीत असेल तर महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेला ते चुड लावीत आहेत. मराठा समाज त्यांचे हक्क मागत आहे व ते त्यांना मिळायला हवे. ओबीसी, आदिवासींसह इतर समाजाच्या हक्कांना धक्का न लावता मराठा, धनगर, समाजाला त्यांचे हक्काचे टिकणारे आरक्षण मिळायला हवे, असे शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

जरांगे-पाटील उपोषण करीत आहेत, पण आरक्षणासाठी लोक रोज आत्महत्या करीत आहेत. समाजाच्या मृत देहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार आहे काय? सरकार मन की बात करत आहे. पण त्यांचे मन निर्दय आहे. जरांगे-पाटील यांचे प्राण वाचवण्याची त्यांची भूमिका दिसत नाही, असे म्हणत राज्य आणि केंद्र सरकारवरही शिवसेनेकडून निशाणा साधण्यात आला आहे. 

जरांगेंना नीट बोलताही येईना

महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसी प्रवर्गातून ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या आमरण उपोषणाचा रविवारी पाचवा दिवस. पाचव्या दिवशी सकाळी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली दिसून आली. जरांगे पाटील यांनी अन्न-पाण्याचा त्याग केल्याने त्यांना निटसे बोलताही येत नव्हते. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचे पथक रविवारीही तपासणी, उपचारासाठी दाखल झाले होते. परंतु, जरांगे पाटील यांनी तपासणी करण्यास, उपचार घेण्यास नकार दिला. 

आत्महत्या करू नका, उग्र आंदोलन करू

जरांगे पाटील यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा बांधवांनी एकजूट व्हावे. फुटू देऊ नये. महाराष्ट्रात जिथे, जिथे साखळी उपोषण आहे तिथे आमरण उपोषणाला सुरुवात करावी. प्रत्येक पोलिस ठाण्यात परवानगीचा अर्ज द्यावा. जेणेकरून सरकारला किती ठिकाणी उपोषण सुरू आहे हे समजेल. उग्र आंदोलन करू नका, आत्महत्या करू नका, असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले. सरकारकडून अद्याप संवाद साधण्यात आला नाही. प्रश्नांची उत्तरेही मिळाली नाहीत. आम्ही त्यांच्याकडून उत्तर घेवू. मला बोलायला त्रास होतोय. मी जास्त बोलू शकत नाही.
 

Web Title: "Give reservation to OBCs without jeopardizing them to maratha samaj"; Uddhav Thackeray's demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.