‘गिरणी कामगारांना घरासाठी जागा द्या’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 03:15 AM2019-06-28T03:15:59+5:302019-06-28T03:16:20+5:30
गेल्या १२ वर्षात केवळ १२ हजार गिरणी कामगारांना घरे दिली असून १ लाख ७४ गिरणी कामगारांना घरे देण्यास अजून कित्येक वर्ष लागतील.
मुंबई - गेल्या १२ वर्षात केवळ १२ हजार गिरणी कामगारांना घरे दिली असून १ लाख ७४ गिरणी कामगारांना घरे देण्यास अजून कित्येक वर्ष लागतील़ त्यामुळे गिरणी कामगारांना घरे बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी सर्व श्रमिक संघटनेने केली आहे. सर्व श्रमिक संघटनेच्या वतीने आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी मुंबईसह कोल्हापूर ,सातारा ,सांगली ,पुणे तसेच रत्नागिरी सिंधदुर्ग येथील गिरणी कामगारांनी सहभाग घेतला.
सर्व श्रमिक संघटनेचे प्रमुख संघटक बी के आंब्रे म्हणाले की, गिरणी कामगारांना घरे देऊन पुर्नवसन करा या मागणीसाठी आम्ही गेली १४ वर्षे सातत्याने आंदोलने करत आहोत. आघाडी सरकारने गिरणी कामगारांचा घराचा हक्क मान्य केला,गिरण्यांच्या जागेवर म्हाडाची घरे बांधली. गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची संख्या एक लाख ७४ हजार १७२ आहे. आजपर्यंत १२ हजार घरे देण्यात आली आहेत़ त्यापैकी आठ हजार जणांनाच घराचा ताबा मिळाला आहे. अशा रीतीने घरे मिळाली तर घरे मिळण्यासाठी आमच्या तीन पिढ्या जातील. त्यामुळे उर्वरित गिरणी कामगारांना घरे कधी मिळणार याचे धोरण भाजप शिवसेना युती सरकारने जाहीर करावे. गिरणी कामगार आणि वारसांना घरहक्क पत्र देण्यात यावे ,अन्यथा २०३४ च्या विकास आराखड्यातुन मोठ्याप्रमाणावर जागा उपलब्ध होणार आहे. स्वयं विकासकामार्गे स्वत:चे घर निर्माण करण्याचा निर्णय गिरणीकामगार व वारसांनी घेतला आहे. त्यासाठी २५ गिरण्यांतील गिरणी कामगारांनी सहकारी गृहनिर्माण संस्थांची स्थापना केली आहे़