Join us

'त्या' कुटुंबांना संसार सावरण्यासाठी प्रतिकुटुंब ५० हजार रुपये द्या अन् पाणीपुरवठा तातडीने सुरळित करा : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2023 9:54 AM

दुर्घटनाग्रस्त जय भवानी एसआरए इमारतीतील रहिवाशांनी खासदार गजानन किर्तीकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.

 मुंबई : गोरेगावच्या उन्नत नगरातील जयभवानी एसआरए इमारत आग दुर्घटनेतील कुटुंबांना आपले संसार सावरण्यासाठी प्रतिकुटुंब ५० हजार रुपये तातडीने द्यावेत, तसेच इमारतीचा पाणीपुरवठाही त्वरेने सुरळीत करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना शनिवारी दिले. त्याचप्रमाणे एसआरए इमारतींना संकटकालीन मार्ग म्हणून बाहेरच्या बाजूने लोखंडी जिने बसविण्यासाठी धोरण तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

दुर्घटनाग्रस्त जय भवानी एसआरए इमारतीतील रहिवाशांनी खासदार गजानन किर्तीकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त आय. एस चहल, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे आदी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये पालिका उपायुक्त विश्वास शंकरवार, पी. दक्षिण वॉर्डचे सहायक आयुक्त राजेश अक्रे, संपर्कप्रमुख उदय सावंत, विभागप्रमुख गणेश शिंदे आदी उपस्थित होते.

स्वतंत्र गोदाम देण्याची सूचनारहिवाशांना कपड्यांचे गाठोडी ठेवण्यासाठी स्वतंत्र गोदाम देण्याची व्यवस्था करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यापुढे पार्किंगमध्ये मोकळ्या जागेत गाठोडे ठेवू नका, असेही त्यांना सांगण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी रहिवाशांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला. दुर्घटनेतील जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची देयके मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून अदा केली जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

या इमारतीचे तातडीने स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिट करावे. त्यानंतर इमारतीला रंगरंगोटी करावी. इमारतीचा पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरू होण्यासाठी दुरुस्तीच्या कार्यवाहीला वेग द्यावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

टॅग्स :एकनाथ शिंदेमुंबई महानगरपालिकापाणी