लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ‘म्हाडा’च्या ४ हजार ८३ सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ सोमवारी ‘गो-लाइव्ह’ कार्यक्रमाअंतर्गत झाला असून, सोडतीचा शुभारंभ केल्याच्या दहा मिनिटांमध्ये सुमारे ११५ अर्ज सोडत प्रणालीत प्राप्त झाले. सहा अर्जदारांनी पेमेंटही केले आहे. सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात होणार आहे. सोडतीत सहभाग घेण्याकरिता अर्जदारांना सात कागदपत्रे सादर करावयाची आहेत.
नवीन सोडत प्रक्रिया ही अत्यंत सुलभ आणि सोपी आहे. अर्जदारांना उत्पन्नाचा दाखला वा प्राप्तिकर विवरणपत्र हे २०२१-२२ या आर्थिक वर्षातील सादर करावयाचे आहे. सर्व कागदपत्रे सादर करणारे अर्जदार हे संगणकीय सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यास पात्र ठरतील. त्यांच्या अर्जंची सोडत काढल्यानंतर पात्र अर्जदारांची यशस्विता ठरविण्यात येईल.
सदनिकांच्या विक्रीकरिता किंवा कोणत्याही कामासाठी कोणालाही दलाल म्हणून नेमलेले नाही. अर्जदारांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीशी परस्पर आर्थिक व्यवहार करू नये. तसे केल्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही.- मिलिंद बोरीकर, मुख्य अधिकारी, मुंबई मंडळ, म्हाडा