Join us  

जगभरातील १० लाख विद्यार्थ्यांना सौरदिव्यांचे प्रशिक्षण देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2019 5:21 AM

विजेचा मोठ्या प्रमाणावर अभाव असतानाच त्याच्या अतिवापरामुळे निर्माण होणाऱ्या समस्या हे जगासमोरील दुसरे मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर व्हावा या उद्देशाने भारताकडूनही प्रयत्न होत आहेत.

मुंबई : विजेचा मोठ्या प्रमाणावर अभाव असतानाच त्याच्या अतिवापरामुळे निर्माण होणाऱ्या समस्या हे जगासमोरील दुसरे मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर व्हावा या उद्देशाने भारताकडूनही प्रयत्न होत आहेत.याचाच भाग म्हणून आयआयटी मुंबईतील प्राध्यापक चेतनसिंग सोलंकी यांनी ‘एनर्जी स्वराज’ला प्रोत्साहन देण्यासाठी ‘गांधी ग्लोबल सोलर यात्रा’ सुरू केली आहे. सौरऊर्जेचा वापर करून जगभरातील विद्यार्थ्यांना सौरऊर्जेच्या वापरासाठी उद्युक्त करण्याचा त्यांचा मानस आहे.गांधी ग्लोबल सोलर यात्रेदरम्यान प्रोफेसर सोलंकी ५० हून अधिक देशांना भेटी देणार आहेत. यादरम्यान ते त्या त्या देशांतील विद्यापीठे, सामाजिक संस्था आणि शासन अधिकारी किंवा विभागांना भेटी देऊन आपला उद्देश मांडणार आहेत. २ आॅक्टोबर २०१९ रोजी १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना सौरदिव्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना सोलर अ‍ॅम्बॅसिडर तयार करण्याचा त्यांचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांपासून सुरुवात झाल्यास सौरऊर्जेचा वापर घराघरांत पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २५ डिसेंबर २०१८ रोजी साबरमती आश्रमापासून ही यात्रा सुरू झाली आहे. साबरमती आश्रमात दोन दिवस राहिल्यानंतर त्यांनी त्यांचा पहिला आंतरराष्ट्रीय दौरा करून इंडोनेशिया, मलेशिया आणि म्यानमार या देशांना भेटी दिल्या.जागतिक तापमानात यापूर्वीच १ सेल्सिअसची वाढ झाली आहे. ती रोखणे जगासमोरील मोठे आव्हान आहे. हवामान बदलाचे परिणाम अत्यंत गंभीर आहेत आणि म्हणूनच २०५० सालापर्यंत, केवळ ३१ वर्षांत जगाला नूतनीकरणीय ऊर्जा वापर १०० टक्क्यांपर्यंत न्यावा लागणार आहे, असे २०१८ सालच्या आयपीसीसी अहवालात म्हटल्याची माहिती सोलंकी यांनी दिली. शाश्वत स्थानिक ऊर्जा स्वयंपूर्णतेला प्रोत्साहन देण्यासाठी गांधी ग्लोबल सोलर यात्रा (जीजीएसवाय) आखण्यात आली आहे. हे विशेषत: ऊर्जा उपलब्ध नसणाºयांसाठी आहे. कारण, आज सातही दिवस चोवीस तास, संपूर्णपणे परवडण्याजोग्या दरात, खात्रीशीर व शाश्वत सौरऊर्जा पुरविणे शक्य आहे. यामुळे पर्यावरणाचे संरक्षणही होते; तसेच स्थानिकांचे सक्षमीकरण व त्यांना उपजीविकेची साधने पुरविणेही शक्य होत असल्याची माहिती त्यांनी दिली.महिलांनाही प्रशिक्षणप्रोफेसर चेतन सोलंकी यांनी देशभरातील विविध राज्यांमध्ये ग्रामीण भागात दहा लाख सौरदिवे वाटले आहेत. इतकेच नव्हेतर, तेथील सुमारे तीन हजार महिलांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. या महिलांना सौरदिवे तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांनी तेच विकून पैसे कमावण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

टॅग्स :मुंबई