Join us

अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकासाठी जागा द्या

By admin | Published: July 19, 2014 1:33 AM

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकासाठी राज्य शासनाने दादर येथील गोल्ड मोहर मिलची जागा देण्याची मागणी महाराष्ट्र परिवर्तन सेनेने केली आहे

मुंबई : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकासाठी राज्य शासनाने दादर येथील गोल्ड मोहर मिलची जागा देण्याची मागणी महाराष्ट्र परिवर्तन सेनेने केली आहे. शुक्रवारी अण्णा भाऊ साठे यांच्या ४५ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या अभिवादन सभेत ही मागणी करण्यात आली.मातंग समाजाच्या न्याय्यहक्कांसाठी मुंबईच्या लढ्यात महत्त्वाची कामगिरी बजावण्यात अण्णा भाऊ साठे यांचा मोलाचा वाटा होता. मातंग समाजाच्या हक्कांसाठी आयुष्य खर्ची घातलेल्या आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद आणि अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत उभे करण्याची गरज आहे. अण्णांच्या स्मारकासाठी गोल्ड मोहर मिलची जागा उपलब्ध आहे. तर लहुजी यांचे स्मारक पुण्यातील १७ एकर जागेवर बांधण्यासाठी संघटना गेल्या दोन वर्षांपासून सतत पुणे तहसीलदार कार्यालयावर मोर्चे काढत आहे. त्यामुळे सरकारने यात पुढाकार घेऊन मातंग समाजाला न्याय मिळवून देण्याची गरज संघटनेचे अध्यक्ष धनराज थोरात यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, संघटनेतर्फे गायरान मातंग समाजामार्फत कसल्या जाणाऱ्या गायरान जमिनी नावावर करण्याची मागणी करण्यात आली. गेल्या तीन पिढ्यांपासून जमीन कसणाऱ्या मातंग समाजातील नागरिकांनी हवेली, चाकण, खेड येथून सुमारे ४ हजार लेखी अर्ज शासनाला पाठवले आहेत.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १९९० सालच्या आधीपासून गायरान जमीन कसणाऱ्या मातंगांना त्या-त्या जमिनी मिळाल्या पाहिजे. त्यासाठी न्यायालयाने शासनाला १९९० सालापूर्वी गायरान जमिनी कसणाऱ्या मातंगांची यादी सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र शासनाने तयार केलेल्या यादीत बहुतेक मातंगांचा समावेशच नाही. त्यामुळे तत्काळ पुरावे असलेल्या मातंगांचा समावेश करून गायरान जमिनी नावावर करण्याची मागणी संघटनेने केली आहे.