मुंबई : एसटी महामंडळात काम करत असलेल्या वाहक, यांत्रिक व इतर प्रशासकीय पदातील गरोदर महिला, स्तनदा माता, एकल माता व पाच वर्षाच्या आतील मुले असणाऱ्या माता यांना कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कामगिरीवर येणे अशक्य नाही. त्यामुळे कोरोना आणि लॉकडाऊन कालावधीत महामंडळाचे नियमित प्रवासी वाहतूक चालू होईपर्यंत या महिलांना विशेष बाब म्हणून घरी थांबण्याची सवलत देण्यात यावी. या महिला कामगारांना या कालावधीत कर्तव्यावर आहेत, असे समजून त्यांना त्यांचे मासिक वेतन अदा करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या राज्य महिला संघटनेने केली आहे.
दिवसेदिवस कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून राज्य सरकारने गरोदर महिलांना घरातच राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत. एसटी महामंडळातील गरोदर महिला कामगार, स्तनदा माता,एकल माता व पाच वर्षाच्या आतील मुलांच्या मातांना त्यांच्या संवेदनशील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना घरी थांबण्याची सवलत द्यावी, अशी मागणी राज्य महिला संघटक शीला नाईकवाडे यांनी केली आहे. यासंदर्भात संघटनेने परिवहन मंत्री अनिल परब, व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.