फ्रंटलाइन वर्करचा दर्जा द्या; वीज कर्मचारी वर्गाचे आंदोलन सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:06 AM2021-05-26T04:06:41+5:302021-05-26T04:06:41+5:30
मुंबई : वीज कामगार, अभियंते व कंत्राटी कामगार कोरोनामुळे मृत्यू पावलेले असून हजारो कामगार व त्यांचे कुटुंबीय या आजाराने ...
मुंबई : वीज कामगार, अभियंते व कंत्राटी कामगार कोरोनामुळे मृत्यू पावलेले असून हजारो कामगार व त्यांचे कुटुंबीय या आजाराने ग्रस्त आहेत. या कामगारांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा देऊन कोरोना प्रतिबंध लसीकरण करावे, ही मागणी केली असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी ऊर्जाक्षेत्रातील तिन्ही कंपन्यांतील कार्यरत असणाऱ्या प्रमुख सहा संघटनांच्या कृती समितीतर्फे सोमवार (दि. २४) पासून राज्यभरात पुकारण्यात आलेले काम बंद आंदोलन मंगळवारीही सुरूच होते.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीने मेडिक्लेम पाॅलिसीत २०२० पासून परस्पर ऊर्जा विभागाकडून टीपीए नेमणे, मेडिक्लेम पाॅलिसीज २०२१ करिता सुरुवातीला तीन महिनेच मुदतवाढ कामगार संघटनांना विश्वासात न घेता देणे, असा हस्तक्षेप सुरू केला आहे. कोरोनाच्या काळात मेडी असिस्ट नवीन टीपीएची नेमणूक केल्यामुळे वीज कामगार, अभियंते, अधिकारी यांच्यात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. म्हणून आंदोलन सुरू आहे, अशी माहिती वीज कर्मचारी, अभियंते संघटना संयुक्त कृती समितीकडून देण्यात आली.