शेतकऱ्यांना तंत्रज्ञान व बाजारपेठ देणे, हेच येस बँकेचे ध्येय - राणा कपूर

By admin | Published: September 29, 2016 12:42 AM2016-09-29T00:42:51+5:302016-09-29T00:42:51+5:30

कृषी उद्योगाला व्यावसायिक स्वरुप देऊन त्यातून शेतकऱ्यांना नफा मिळवून देता यावा म्हणून आमची बँक प्रयत्नशील आहे. त्यासाठी पायाभूत सुविधा तयार करुन शेतकऱ्यांच्या मालाला

To give technology and market to farmers, Yes Bank's mission - Rana Kapoor | शेतकऱ्यांना तंत्रज्ञान व बाजारपेठ देणे, हेच येस बँकेचे ध्येय - राणा कपूर

शेतकऱ्यांना तंत्रज्ञान व बाजारपेठ देणे, हेच येस बँकेचे ध्येय - राणा कपूर

Next

मुंबई : कृषी उद्योगाला व्यावसायिक स्वरुप देऊन त्यातून शेतकऱ्यांना नफा मिळवून देता यावा म्हणून आमची बँक प्रयत्नशील आहे. त्यासाठी पायाभूत सुविधा तयार करुन शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ आणि शेती तंत्रज्ञान उपलब्ध करुन देणे, हे आमच्या बँकेचे ध्येय असल्याचे प्रतिपादन येस बँकेचे चेअरमन राणा कपूर यांनी केले.
राणा कपूर यांनी लोकमतच्या मुंबई येथील कार्पोरेट कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी संपादकीय मंडळाशी मुक्त संवाद साधला. लोकमत मीडिया लि.चे चेअरमन माजी खा. विजय दर्डा यांनी त्यांचे स्वागत केले.
येस बँक असे नाव बँकेला देण्यामागे आपली भूमिका काय होती? असे विचारले असता राणा कपूर म्हणाले, ‘येस’ मध्येच ठाम असा सकारात्मक विचार आहे आणि आमची बँक त्या दृष्टीने काम करते. त्यातूनच आम्ही ‘इंडिया बोले येस’ हे घोषवाक्य निवडले. सर्वांनी सकारात्मक बदलांची भूमिका ठेवली, तर देशात खूप चांगले बदल घडू शकतात. आमच्या बँकेचाही त्याच भूमिकेवर विश्वास आहे. तसेच परस्पर विश्वास, ज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड, पारदर्शक व जबाबदार बँकर्स हे आमच्या कामाचे वैशिष्ट्य आहे.
खासगी बँका शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यात उत्सूक नसतात, असा सवाल विजय दर्डा यांनी काही उदाहरणे देऊन केला, तेव्हा कपूर म्हणाले, आपल्याकडे शेतकऱ्यांसाठी कर्जपुरवठ्यातल्या अनेक योजना आहेत. तसे न करता शेतीच्या विशिष्ट कामांसाठी विशिष्ट योजना असायला हव्यात. तसे झाल्यास नेमक्या योजनांना कर्ज देणे शक्य होते. हाच धागा पकडून ते पुढे म्हणाले, बँकांनी मनी डॉक्टर्स म्हणून काम केले पाहिजे. अशा ‘डॉक्टर्स’नी कर्जासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या व इतरांच्या भौगोलिक तसेच औद्योगिक तसेच संबंधित भागात असणाऱ्या पायाभूत सोयी सुविधा आणि गरजा यांचा ताळमेळ साधून कर्जपुरवठा केला तर शेती व उद्योग फायद्यात येऊ शकतील. त्याचवेळी बँकांचेही कर्जपुरवठा करण्याचे काम सुकर होईल. परिणामी बँकांची कर्ज वसुलीही व्यवस्थित होईल.
मोठ्या प्रमाणावर बँकांची कर्जे बुडीत झाली आहेत. मोठ्या उद्योगांची कर्जे माफ केली गेली, तर काही ठिकाणी कर्जे बुडवली गेली, याचा फटका बँकांना व मध्यमवर्गीय ठेवीदारांनाही बसला. या सगळ्याकडे तुम्ही कसे पाहता, असे विचारता कपूर म्हणाले, २००८-०९ चा आर्थिक मंदीचा अन्य देशांच्या तुलनेत भारताला बसलेला फटका तुलनेने कमी होता. मात्र त्याचे परिणाम आपल्यावर झाले, हे लक्षात घेतले पाहिजे. काही उद्योग बंद पडले, काही डबघाईला आले, त्यामुळे काही कर्जे बुडाली व काहींची कर्जे बँकांनी पुर्नगठीत केली.
बँकांना हे करावेच लागते. अर्थात काहींचा हेतू कर्ज बुडवण्याचाही होता, हेही विसरून चालणार नाही. आर्थिक मंदीचा फटका आॅक्टोबर २०१० मध्ये भारताला बसला. आपली अर्थव्यवस्था मजबूत असली तरी आपला जीडीपी ९ टक्क्यांवरून ६ टक्क्यांवर आला. ती धोक्याची घंटा होती. मात्र त्यातून आपण सावरलो. आपण जागतिक अर्थव्यवस्थेचा एक भाग आहोत याची जाणीवही त्याच काळाने आपल्याला करून दिली. आता पुन्हा आपली वाटचाल ९ टक्के जीडीपीच्या दिशेने सुरू आहे.
अनेक व्यावसायिक प्रतिष्ठाने व कंपन्या सीएसआरच्या (सामाजिक जबाबदारीच्या भावनेने) माध्यमातून काम करत आहेत. सामाजिक जबाबदारी म्हणून येस बँक नेमके काय करत आहे, असे विचारले असता कपूर म्हणाले, हरित अर्थव्यवस्थेवर आमचा भर आहे.आम्ही ‘वॉटर एटीएम’ हा प्रयोग सुरू केला आहे. केलेल्या कामाचे मूल्यमापन होणे गरजेचे असते. नुसता खर्च करून भागत नाही, त्यासाठी आम्ही महाविद्यालये आणि विद्यापीठ पातळीवर विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत आहोत. सीएसआरअंतर्गत केलेल्या कामाच्या मूल्यमापनासाठी आमच्याकडे साडेपाच लाख तरुणांनी अर्ज केले आहेत. त्यातील काहींची निवड केली जात आहे. त्यांना सहभागाच्या रूपाने रोजगार मिळू शकेल. अशा सामाजिक कामात तरुणांचा सहभाग वाढावा अशी आमची भूमिका आहे. त्यामुळेच बँकेचा भर सातत्याने नवनवीन संकल्पना व कल्पक मांडणीचे उपक्रम हाती घेणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: To give technology and market to farmers, Yes Bank's mission - Rana Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.