मोडकळीस आलेल्या इमारतीतील रहिवाश्यांना तात्पुरते राहण्यास जागा द्या!
By मनोहर कुंभेजकर | Published: July 3, 2023 04:04 PM2023-07-03T16:04:53+5:302023-07-03T16:05:47+5:30
खासदार गोपाळ शेट्टी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गेल्या काही वर्षांपासून मुंबई शहरात विशेषतः पावसाळ्यात जुन्या इमारती कोसळून अनेक लोक मृत्यमुखी पडल्याच्या घटना या वर्षी सुद्धा घडल्या आहेत. मुंबई महापालिकेने दुरावस्था असलेल्या इमारतींना ३५४ कलमा अंतर्गत नोटीस बजावली आहे.
अशा सर्व इमारतीत राहणारे लोक मध्यम वर्गीय किंवा त्यापेक्षाही ही खालच्या स्तरावरील असून मुंबई शहरात आजच्या तारखेस असलेले भाडे ही त्यांना परवडत नाही. मुलांच्या शाळा, स्वतःचा व्यवसाय, नोकरी जवळपास असल्याने दूर ठिकाणी जाणे त्यांना सोयीचे होत नाही. त्यामुळे नाईलाजाने काही रहिवासी कोर्टात धाव घेतात तर काही लोक स्थलांतरित होण्यास विरोध करतात. त्यामुळे मुंबई शहरातील मोडकळीस आलेल्या इमारतीतील रहिवाश्यांना, पालिका तसेच एस.आर. ए. कडील पडून असलेल्या जागांमध्ये तात्पुरते राहण्यास जागा द्या असे पत्र उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.आपण विनाविलंब बृहन्मुंबई महापालिका आयुक्तांना यांना आदेश निर्गमित करून एक खूप मोठा निर्णय आपल्या कार्यकाळात व्हावा अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
मुंबई शहरात पालिका तसेच एस.आर.ए. मधील अनेक १८०, २२५ तसेच २६९ स्क्वेअर फुटाची घरे गेली अनेक वर्षांपासून रिकामी आहेत. त्यामुळे अशा सर्व जागेत मोडकळीस आलेल्या इमारतीतील नागरिकांना तात्पुरते राहण्यास देऊन त्यांना दिलासाच नव्हे तर त्यांचे जीव वाचविण्यामध्ये मुंबई महापालिका एक खूप मोठी भूमिका अदा करू शकते असे खासदार शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.