आमच्या रक्तपेढीची जागा आम्हाला परत द्या; जे. जे. प्रशासनाचे प्रयत्न, वाद रंगण्याची चिन्हे

By संतोष आंधळे | Published: April 15, 2023 06:08 AM2023-04-15T06:08:46+5:302023-04-15T06:08:58+5:30

१५ वर्षांपूर्वी सार्वजनिक आरोग्य विभागाने सर जे. जे. रुग्णालयाच्या परिसरातील हेरिटेजचा दर्जा असलेली डी. एम. पेटिट इमारत रक्तपेढी उभारण्यासाठी घेतली होती.  

Give us back our blood bank space J J Administration efforts, signs of controversy | आमच्या रक्तपेढीची जागा आम्हाला परत द्या; जे. जे. प्रशासनाचे प्रयत्न, वाद रंगण्याची चिन्हे

आमच्या रक्तपेढीची जागा आम्हाला परत द्या; जे. जे. प्रशासनाचे प्रयत्न, वाद रंगण्याची चिन्हे

googlenewsNext

मुंबई :

१५ वर्षांपूर्वी सार्वजनिक आरोग्य विभागाने सर जे. जे. रुग्णालयाच्या परिसरातील हेरिटेजचा दर्जा असलेली डी. एम. पेटिट इमारत रक्तपेढी उभारण्यासाठी घेतली होती.  त्याठिकाणी त्यांनी सर जे. जे. महानगर नावाने रक्तपेढी सुरू केली.  मात्र, सध्याच्या घडीला जे. जे. रुग्णालयाला ‘एम. डी. ट्रान्फ्यूजन मेडिसिन’  हा नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी जागा कमी पडत आहे. त्यामुळे जे. जे. महानगर रक्तपेढीला दिलेली जागा परत मिळविण्यासाठी जे. जे. रुग्णालयाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. जे. जे. महानगर रक्तपेढीने मात्र ही जागा  परत देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याची भूमिका घेतल्याने हा वाद लवकरच मंत्री दरबारी जाणार असल्याचे चित्र आहे.

ही जागा मिळविण्याबाबत यापूर्वी चर्चा करण्यात आली होती. मात्र, फारसे प्रयत्न केले जात नव्हते. यावेळी मात्र ही जागा मिळविण्यासाठी जे. जे. रुग्णालय प्रशासनाने पत्रव्यवहार सुरू केला आहे. तसेच त्यांनी या संदर्भातील सर्व माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. दक्षिण मुंबई परिसरात मोक्याच्या असणाऱ्या या जागेची जे. जे. रुग्णालय प्रशासनाला ‘एम. डी. ट्रान्फ्यूजन मेडिसिन’ हा नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आवश्यकता असल्याने त्यांनी जागेची मागणी रक्तपेढीकडे केली आहे.

या विषयासंदर्भात पूर्वीच सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांनी उत्तर दिले असून, ही इमारत राज्य रक्तसंक्रमण परिषदेला दिली असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ती जागा परत देण्याचा प्रश्नच आता उद्भवत नाही. आम्ही शासनाने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे सेवा शुल्क घेत आहोत. अन्य कुठल्याच रुग्णालयात रक्त मोफत दिले जात नाही. त्यामुळे जे. जे. रुग्णालयातील रुग्णांकडून आम्ही तेवढाच दर घेतो.
- डॉ. हितेश पगारे, उपसंचालक, सर जे. जे. महानगर रक्तपेढी  

मूळ म्हणजे ही जागा जे. जे. रुग्णालयाच्या प्रशासनाची आहे. सध्या आम्हाला त्या जागेची गरज आहे. त्यासाठी आम्ही ती जागा मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्या जागेला ऐतिहासिक दर्जा आहे. वैद्यकीय महाविद्यालयात  नवनवीन विषय सुरू करण्यात येत आहेत. रक्त विषयातील नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी  राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नियमानुसार काही विशिष्ट जागेची गरज असते. त्यामुळे सध्या आम्हाला ही जागा हवी आहे.  
- डॉ. पल्लवी सापळे, 
अधिष्ठाता, सर जे. जे. समूह रुग्णालये

एका बैठकीत हा विषय निघाला होता, त्यावर बोलणेही झाले होते. मात्र, अंतिम निर्णय झाला नव्हता. आम्ही आमची जागा मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
- डॉ. अश्विनी जोशी, 
सचिव, वैद्यकीय शिक्षण विभाग

Web Title: Give us back our blood bank space J J Administration efforts, signs of controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.