यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीत चारच जागा मिळणार असे म्हटले जात असले तरी प्रत्यक्ष या पक्षाने महायुतीत किमान नऊ ते दहा जागा मागितल्याने पेच निर्माण झाला आहे. जागावाटपाची बोलणी आता १६ किंवा १७ मार्चला नवी दिल्लीत होण्याची शक्यता आहे.
बारामती, परभणी, शिरूर व रायगड या चार जागा राष्ट्रवादीला मिळतील, अशी चर्चा आहे. मात्र, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी ही चर्चा फेटाळून लावली. सूत्रांनी सांगितले की, राष्ट्रवादीने या चार जागांसोबतच भंडारा-गोंदिया, गडचिरोली, धाराशिव, सातारा, नाशिक, बुलडाणा या जागाही मागितल्या. यवतमाळ-वाशिममध्येही आमच्याकडे योग्यतेचे एक नाही तर दोन उमेदवार आहेत. भंडारा-गोंदिया येथे स्वत: लढण्याची तयारी प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाकडे दर्शविली आहे, अशी माहिती पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’ला दिली.
भाजपची डोकेदुखी वाढली
भाजपचे विद्यमान खासदार असूनही महाराष्ट्राच्या पहिल्या यादीत भंडारा-गोंदिया, गडचिरोली आणि उत्तर-मध्य मतदारसंघातील उमेदवार भाजपने जाहीर केलेले नाहीत. त्यातील भंडारा-गोंदिया आणि गडचिरोलीची जागा युतीमध्ये राष्ट्रवादीने मागितल्यामुळे अंतिम निर्णय होईपर्यंत उमेदवार जाहीर करायचे नाहीत, अशी भूमिका भाजपने घेतली असल्याचे म्हटले जाते. या दोन मतदारसंघांमध्ये भाजपला उमेदवारांच्या दोन पर्यायांपैकी एक निवडायचा असल्यानेही पेच असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवसेनेचे १३ खासदार आहेत, त्यापेक्षा दोन तरी जागा वाढवून मिळाव्यात, अशी त्या पक्षाची मागणी आहे. राष्ट्रवादीने ९ ते १० जागा मागितल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे.
भाजपला आणखी किती जागा?
भाजपने राज्यातील २० उमेदवार जाहीर केले आहेत. गेल्या वेळी भाजपने २५ जागा लढविल्या होत्या. त्यातील बारामतीची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे जाणार आहे. आणखी एखादी जागा मित्रपक्षाला दिली जाऊ शकते. सूत्रांनी सांगितले की भाजपने जास्तीत जास्त ३० जागा लढाव्यात आणि शिवसेना व राष्ट्रवादीला १८ जागा द्याव्यात असा दबाव या मित्रपक्षांनी वाढविला आहे.
आमच्या पक्षाला केवळ चार जागा मिळतील असे वृत्त देणारी माध्यमे प्रत्यक्ष जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होईल तेव्हा तोंडघशी पडल्याशिवाय राहणार नाही. आमचा पक्ष मजबूत आहे. आम्हाला सन्मानजनकच जागा मिळतील. - खा. प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते.