Join us

सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:06 AM

उच्च न्यायालयात याचिकालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला व ...

उच्च न्यायालयात याचिका

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला व त्यांच्या कुटुंबीयांच्या जिवाला धोका असल्याने त्यांना ‘''झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा द्यावी. तसेच त्यांना धमकी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी फौजदारी रिट याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

गेल्या महिन्यात अदर पूनावाला यांनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, त्यांना देशातील वेगवेगळ्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांकडून व मोठ्या व्यक्तींकडून धमक्या मिळत आहे. ते आणि त्यांचे कुटुंब सुरक्षित नाही. या पार्श्वभूमीवर व्यवसायाने वकील असलेले दत्ता माने यांनी पूनावाला यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यासाठी व त्यांना धमक्या देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

पूनावाला यांचे सिरम इन्स्टिट्यूट कोव्हिशिल्ड या कोरोनावरील लसीचे उत्पादन करीत आहे. आतापर्यंत लाखो लोकांना ही लस देण्यात आली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी ही लस आवश्यक आहे. देशात आतापर्यंत केवळ दोन टक्केच लोकांचे लसीकरण झाले आहे. उर्वरित ९८ टक्के लोकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला लसीची आवश्यकता आहे. सिरमने पूर्ण क्षमतेने काम करण्यासाठी त्यांच्या सीईओचे देशात असणे आवश्यक आहे. अन्यथा लसनिर्मितीचे काम मंदावील. त्यामुळे पूनावाला व सिरमच्या संपत्तीचे रक्षण करण्यात यावे. अदर पूनावाला यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात यावी. सध्या त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात येत आहे, असे याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

.....................