अवयवदानामुळे मिळाले तिघांना जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 01:28 AM2019-05-26T01:28:09+5:302019-05-26T01:28:12+5:30
ठाण्यातील खासगी रूग्णालयात गुरुवारी अवयवदान पार पडले. यामुळे तीन जणांना जीवनदान मिळण्यास मदत होते.
मुंबई : ठाण्यातील खासगी रूग्णालयात गुरुवारी अवयवदान पार पडले. यामुळे तीन जणांना जीवनदान मिळण्यास मदत होते. मुंबईतील हे ३८ वे अवयवदान असून यंदाच्या वर्षी अवयवदानाचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण जिल्हा अवयव प्रत्यारोपण समितीने नोंदविले आहे.
कांदिवलीत राहणाऱ्या ४७ वर्षीय व्यक्तीचा दुचाकीवरुन अपघात झाला होता. अपघातानंतर तातडीने या व्यक्तीला ठाण्यातील रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान डॉक्टरांनी त्याला ब्रेनडेड घोषित केले. त्यानंतर कुटुंबाच्या संमतीने त्या रुग्णाचे अवयवदान केले. यासंदर्भात रुग्णालयाचे समन्वयक अनिरूद्ध कुलकर्णी म्हणाले, रूग्ण ब्रेनडेड झाल्यानंतर या व्यक्तीच्या कुटुंबाकडे अवयवदानाची परवानगी मागण्यात आली. कुटुंबाने परवानगी दिल्यानंतर यकृत, डोळे आणि दोन्ही किडनी दान करण्यात आलीये. झेडटीसीसीच्या नियमावलीनुसार, यकृत त्याच रूग्णालयातील रूग्णाला तर दोन्ही मूत्रपिंड चर्नीरोड येथील खासगी रुग्णालयातील रुग्णाला दान करण्यात आल्या. डोळे ठाण्यातील नेत्रपेढीत दान करण्यात आलेत.