भाजपने साधला सरकारवर निशाणा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केल्याचा दावा महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. मात्र, मुंबई आणि महाराष्ट्राची आजची अवस्था पाहता पंतप्रधान मोदी कौतुक करतील, याची सुतराम शक्यता नाही, अशा शब्दात भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी रविवारी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी राज्याच्या कामगिरीचे कौतुक केल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. यावर, भाजपचे केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीवर आज निशाणा साधला. आता घरीबसल्या बसल्या पंतप्रधानांनी यांचं कौतुक केले, याचा नवा खेळ खेळला जातो आहे. मुंबई आणि महाराष्ट्राची आजची अवस्था पाहता ते कौतुक करतील, याची सुतराम शक्यता नाही. शिवाय, कौतुक केल्याची बतावणी मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रेस नोटने केल्याचे सांगत उपाध्ये यांनी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
स्वत:च उदोउदो करत फिरायचे, आगा ना पिछा बोलत रहायचे, अपयश आलं की केंद्रावर ढकलायचे ही या राज्य सरकारची त्रिसूत्री आहे. सर्वोच्च न्यायालयाची एक टिप्पणी कौतुक म्हणून मिरवायची आणि मुंबई हायकोर्ट जेव्हा म्हणते की जे नंदुरबारला जमले, ते मुंबईला का नाही? तेव्हा मूग गिळून गप्प बसायचे. कोरोना कमी झाला की आम्ही जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार आणि वाढला की जनतेचा निष्काळजीपणा, असा हा मामला असून एकाच आयुष्यात सोंगे करायची तरी किती, असा खाेचक प्रश्न उपाध्ये यांनी केला.
* आघाडीच्या नेत्यांनाही लगावला टोला
वास्तव माहिती लपवून पंतप्रधानांकडून कौतुक करून घेतल्याच दावा करताना ‘मनाचा आतला आवाज’ तरी मुख्यमंत्र्यांनी ऐकायला हवा, असे सांगतानाच प्रत्येक बाबतीत जनसंपर्क एजन्सी वापरू नका हेच तर देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या पत्रात म्हटले आहे. मग इतके झोंबले का? शिवसेनेचा संगत-गुण राष्ट्रवादीला लागला का कोण जाणे, असे विचारत या संदर्भात टिप्पणी करणाऱ्या आघाडीच्या नेत्यांनाही उपाध्ये यांनी टोला लगावला.
---------------------------
...................................