मुंबई : तहान भागविण्यासाठी सर्वसामान्यांचा ओढा आपोआपच काहीतरी थंड पिण्याकडे जातो आणि कृत्रिम शीतपेयांचा आस्वाद घेऊन तो बहुतेक वेळा हुश्श.. करतो. पण कृत्रिम शीतपेयांच्या सेवनाने कितीतरी घातक द्रव्ये पोटात ढकलत असतो याचा विसर पडतो. शिवाय, लहानग्यांच्या प्रकृतीसाठी तर ही शीतपेये अधिक जीवघेणी ठरतात, त्यामुळे दीर्घकाळ आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याचा धोका असतो. शीतपेयांमध्ये अत्यंत घातक अशा ‘ब्रोमिनेटेड व्हेजिटेबल ऑइल’चा (बीव्हीओ) समावेश आहे. याखेरीज, बऱ्याचदा कोल्डिंक वा एनर्जी ड्रिंक्समध्ये रासायनिक, कृत्रिम पदार्थांचा सर्रास वापर केला जातो. त्यामुळे ही दोन्ही पेये घातक आहेत.
कृत्रिम शीतपेयांमध्ये प्रामुख्याने कॅफीन, घातक कृत्रिम रंग, कार्बन डायऑक्साइड, अॅल्युमिनियम आदींचा वापर प्रामुख्याने असतो. फॉस्फरिक अॅसिडमुळे शरीरातील पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम यांचे प्रमाण बिघडते. त्यामुळे आर्थरायटिस, मूतखडा, रक्तवाहिन्या कठीण होणे आदी विकार जडण्याची शक्यता असते.
धोके अधिक
सतत शीतपेय, एनर्जी ड्रिंक्स प्यायल्याने शरीराची पचनक्रिया मंदावल्याने शरीरावरील चरबी वाढते. शीतपेयांमध्ये असणाऱ्या सोड्याच्या प्रमाणामुळे वजन वाढण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे जे लोक जास्त प्रमाणात शीतपेये घेतात त्यांच्यात लठ्ठपणाची समस्या आढळून येते. लठ्ठपणामुळे मधुमेह आणि इतरही अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. शीतपेयांमध्ये जास्त प्रमाणात कॅफीन आणि साखर असते. हे दोन्ही घटक शरीरासाठी अतिशय घातक असतात.
हाडं ठिसूळ होण्याचा धोका
शीतपेयांमध्ये सोड्याचे प्रमाण अधिक असल्याने ते आरोग्यासाठी घातक असते. यामुळे तोंडाचे आरोग्य बिघडते. दातांवर शीतपेयांचे थर साचल्याने दात लवकर किडतात. त्यामुळे जास्त प्रमाणात शीतपेय घेत असाल तर त्याचे प्रमाण नक्कीच कमी करायला हवे. हाडांमध्ये असणाऱ्या खनिजांवर सोड्याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे हाडे ठिसूळ होतात आणि वारंवार फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते. तसेच शीतपेयांमध्ये असणाऱ्या कॅफीनमुळे शरीरातील कॅल्शियम लघवीवाटे शरीराबाहेर जाते. त्यामुळेही हाडांना पुरेसे पोषण न मिळाल्याने ती ठिसूळ होतात. - डॉ. परेश संघवी, बालरोगतज्ज्ञ