Join us

जागतिक वारसा सप्ताहानिमित्त गडकोटांवरील स्वच्छता अभियानात सहभागी संस्थांचा होणार सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 8:56 PM

जागतिक व देशव्यापी मोहीमेचा भाग म्हणून राज्य सरकारच्यावतीने १९ ते २५ नोव्हेंबर दरम्यान जागतिक वारसा सप्ताह म्हणून साजरा करीत आहे.

मुंबई :  युनेस्कोद्वारा १८ एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन तसेच भारत सरकारद्वारा १९ ते २५ नोव्हेंबर हा जागतिक वारसा सप्ताह म्हणून साजरा केला जातो. याचा उद्देश जन सामान्यांमध्ये प्राचीन वारश्याबद्दल जागृती निर्माण करणे व भावी पिढ्यांना सांस्कृतिक ठेव्याविषयी आस्था निर्माण करणे हा असतो. ह्या जागतिक व देशव्यापी मोहीमेचा भाग म्हणून राज्य सरकारच्यावतीने १९ ते २५ नोव्हेंबर दरम्यान जागतिक वारसा सप्ताह म्हणून साजरा करीत आहे.

सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत येणाऱ्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयातर्फे या निमित्ताने प्राचीन वारश्यासंबंधी व्यापक जनजागृतीचे कार्यक्रम घेतले जाणार आहेत. नागपूर विभागात नगरधन येथील उत्खननात सापडलेल्या पुरावस्तुचे छायाचित्र प्रदर्शन तसेच नगरधन येथे स्वच्छता अभियान, औरंगाबाद विभागातील सोनेरी महल येथे प्राचीन नाण्यांचे तर नांदेड विभागतर्फे स्मारकाच्या जतन दुरुस्ती कार्यांची छायाचित्रप्रदर्शनी हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नाशिक विभागात सरकारवाडा येथे संस्कृती व आपण तसेच स्मारकाच्या जतन दुरुस्ती कार्यांवर छायाचित्र प्रदर्शनी हेरिटेज वॉक, कला व संस्कृती या विषयांवर कार्यशाळा व व्याख्याने तर पुणे विभागात तुंग, पांडवदरा, लक्ष्मी विलास पॅलेस, कोयरीगड, निरानृरसिंहपूर व संग्रामदुर्ग येथे स्वच्छता अभियान करायचे नियोजित आहे. रत्नागिरी विभागातर्फे थिबा पॅलेस येथे स्वच्छता अभियान व इतर जनजागृतीचे कार्यक्रम निर्धारीत आहेत.

संचालनालयाअंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर, चंद्रकांत मांढरे, नागपूर, सिंदखेड राजा, औरंगाबाद, सांगली, सातारा, औंध, नाशिक, रत्नागिरी, पैठण, तेर व माहूर या १३ शासकीय संग्रहालयांमध्ये चित्रकला स्पर्धा, प्राचीन पध्दतीची दगडी हत्यारे व मातीची भांडी बनवण्याची कार्यशाळा, वारसा संबंधी व्याख्याने, गडकिल्ला परिसंवाद, संग्रहालय परिसर स्वच्छता अभियान, वकृत्व स्पर्धा, जनजागृतीसंबंधी नाटक, वारस जागृती संबंधी प्रदर्शित करण्यात आलेल्या वस्तुंची विद्यार्थ्यांना माहिती देणे इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या संग्रहालयामध्ये या सप्ताहाचा समारोप स्पर्धकांना पारितोषिक व या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या व्याख्यानाने होईल.

सांस्कृतिका कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते उद्या २३ नोव्हेंबर,२०१७ रोजी जागतिक वारसा सप्ताहाच्या दरम्यान गडकोटांवर स्वच्छता अभियानात सहभागी संस्थांना पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी मुंबई येथे सायंकाळी ५ वाजता सन्मानित करण्यात येईल. तसेच महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना ‘प्राचीन वारसा जतन’ करण्यासाठी प्रेरीत करतील. याप्रसंगी ‘गड संवर्धनाच्या मार्गावर’ या संचालनालयातर्फे निर्मित पुस्तकाचे प्रकाशन करतील. जनसामान्यांमध्ये प्राचीन स्मारके व वस्तु जपण्याची भावना या आयोजनामुळे वाढीस लागेल व वारसा जतनाचे कार्य केवळ सरकारचे नसून त्यात जनसहभागही आवश्यक आहे हे अधोरेखित होईल.

टॅग्स :मुंबई