काचेच्या इमारती करताहेत घात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 01:58 AM2020-02-15T01:58:04+5:302020-02-15T01:58:13+5:30
सूचनांकडे दुर्लक्ष : फायर फायटिंग सिस्टीम कार्यान्वित नसल्याने आग आटोक्यात आणण्यात अडथळे
मुंबई : मुंबईत आगी लागण्याचे सत्र सुरूच आहे. बुधवार ते गुरुवार सकाळ या २४ तासांच्या कालावधीत मुंबईच्या पश्चिम उपनगरात सिलिंडर स्फोटासह आगीच्या दोन दुर्घटना घडल्या. यात १५ जण जखमी झाले. वांद्रे, कांदिवली आणि अंधेरी येथे या दुर्घटना घडल्या आहेत. अंधेरी येथील आगीने पुन्हा एकदा काचेच्या इमारती कितपत सुरक्षित आहेत; हा प्रश्न उपस्थित झाला आहे. परिणामी इमारती काचेच्या जरी असल्या तरी त्या काचा अग्निरोधक असाव्यात. इमारतीमधील जागा बंदिस्त नसावी तर खिडक्या मोठ्या आणि खुल्या असाव्यात. महत्त्वाचे म्हणजे इमारतीची अग्निशमन यंत्रणेची कायम देखभाल दुरुस्ती करावी. हे सगळे नियम पाळले तर आगीच्या दुर्घटनांत जाणारे मुंबईकरांचे जीव वाचतील, असे म्हणणे अग्निशमन क्षेत्रातील तज्ज्ञांनी मांडले आहे.
मुंबईत जेव्हा ग्लास ब्लेझिंग इमारती आल्या; तेव्हा त्या उभ्या करताना अग्निरोधक काचा वापरणे गरजेचे आहे; असे वारंवार बजाविण्यात आले होते. मुंबई अग्निशमन दलानेही सातत्याने या घटकावर भर दिला आहे, असे सांगत मुंबई अग्निशमन दलाचे निवृत्त अधिकारी सुभाष राणे यांनी काचेच्या इमारतीमधील सुरक्षेवर प्रकाशझोत टाकला. राणे यांनी सांगितले की, नॅशनल बिल्डिंग कोडचा विचार केला तर यात सर्व बाबी समजावून सांगितल्या जातात. बांधकाम साहित्य हे अग्निरोधक असावे; यावर भर देण्यात येतो. भिंती, दरवाजांसह प्रत्येक घटक कसा अग्निरोधक असावा; यावर भर देण्यात आलेला असतो. आपल्याकडे जेव्हा व्यावसायिक (कमर्शियल) इमारती आल्या; तेव्हा त्या उभ्या करताना काचांचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. अशा इमारतींमध्ये अग्निरोधक काचा असाव्यात म्हणून मुंबई अग्निशमन दलाने परिपत्रक काढले होते. जनजागृती केली होती. कार्यशाळा घेतल्या होत्या. आता नव्याने उभ्या राहत असलेल्या इमारतींमध्ये अग्निरोधक काचा बसविल्या जातात. मात्र जुन्या इमारतीत हे प्रमाण फार कमी असते. अशा काचांची गुणवत्ता चांगली नसेल तर आगीदरम्यान या काचा वितळतात अथवा खाली पडतात.
जुन्या इमारतींना सज्जा होता. खिडकी किंवा दरवाजांवर सज्जा होता. मात्र आता नव्या इमारतींमध्ये हे दिसत नाही. काचेच्या इमारतीत सज्जाचा अभावच असतो. सज्जाचा फायदा असा की, यामुळे आग वरच्या बाजूला पसरत नाही. सध्याच्या ग्लास ब्लेझिंग इमारतींना सज्जा नसतो. त्यामुळे एका माळ्यावरून वरच्या मजल्यावर आग पसरते. आजघडीला ग्लास ब्लेझिंग इमारतींना सज्जा नाही. त्यामुळे आग पसरते. कालांतराने ज्या इमारती उभ्या राहिल्या; त्या इमारतींना अग्निसुरक्षा देताना काचा तापू नयेत म्हणून अनेक बाबी सुचविण्यात आल्या. यात स्पिंकलर्स, वॉटर कंटेनर्सचा समावेश आहे. आगीच्यावेळी ही यंत्रणा सुरू झाली तर काच फुटणार नाही अथवा आग पसरणार नाही. अशा सूचना नॅशनल बिल्डिंग कोडने दिल्या आहेत. मात्र या सूचना पाळण्यात आल्या नाहीत. फायर फायटिंग सिस्टीम कार्यान्वित नसेल तर अडचणी येतात.
अलीकडे आगी भडकण्याचे कारण असे की, दुर्घटनाग्रस्त इमारतींमध्ये फायर फायटिंग सिस्टीम असते, पण कार्यान्वित नसते. तिची देखभाल दुरुस्ती केली जात नाही. मग आग शमविण्यास विलंब होतो. जर फायर फायटिंग सिस्टीमची देखभाल दुरुस्ती केली तर आग लवकरात लवकर शमेल. आग पसरणार नाही. थोडक्यात काय तर अग्निरोधक काच वापरली पाहिजे. सूचना पाळली पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विकासक सिस्टीम पुरवित असतो. आर्किटेक्टही आपले काम करतो. मुंबई अग्निशमन दलसुद्धा इमारतीची तपासणी करते. मात्र त्यापुढे जर फायर फायटिंग सिस्टीमची देखभाल दुरुस्तीच झाली नाही, तर अडथळे येतात.
- सुभाष राणे, निवृत्त अधिकारी, मुंबई अग्निशमन दल
इमारतीत हवा खेळती राहणे महत्त्वाचे
अग्निशमन यंत्रणेची देखभाल दुरुस्ती केली तर काचेची इमारत असली तरी हानी मोठ्या प्रमाणावर थांबविता येते. मोठी हानी होत नाही. याव्यतिरिक्त इमारतीत हवा खेळती राहणे महत्त्वाचे आहे. खिडक्या मोठ्या किंवा खुल्या पाहिजेत. याचा फायदा दुर्घटनांमध्ये होतो आणि कायदेशीर बाबींची पूर्तता करणे गरजेचे आहे.
मुंबईत काचेच्या इमारती बांधताना अग्निरोधक काचा वापरल्या जातात का? काचेच्या इमारतीतील फायर फायटिंग सिस्टीम कार्यान्वित असते का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या सगळ्या बाबी क्रियाशील असतील किंवा याची काळजी घेतली गेली तर काचेची इमारत असली तरी होणारे नुकसान टाळता येईल.