मुंबईत काचेच्या घुमटाचा टाऊन हॉल; पालिकेकडून हेरिटेज संवर्धनाचा आणखी एक प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 09:10 IST2025-04-24T09:10:16+5:302025-04-24T09:10:53+5:30
क्रीडा भवनाच्या जागेत होणार पुनर्विकास, इमारतीमध्ये काचेचा घुमट (ग्लास डोम) तसेच व्हिविंग गॅलरी असेल. गॅलरीपर्यंत जाण्यासाठी काचेच्या कॅप्सूल लिफ्ट असतील.

मुंबईत काचेच्या घुमटाचा टाऊन हॉल; पालिकेकडून हेरिटेज संवर्धनाचा आणखी एक प्रयत्न
मुंबई - पुरातन वारसा स्थळ असलेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाचा परिसर पालिकेच्या प्रयत्नातून आणखी दिमाखदार होणार आहे. महापालिका मुख्यालय इमारतीसमोर असलेल्या महानगरपालिका क्रीडा भवन जागेचा पुनर्विकास करून याठिकाणी विविध वैशिष्ट्यांनी नटलेली ‘टाऊनहॉल जिमखाना’ वास्तू पालिकेकडून उभारण्यात येणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, महापालिका मुख्यालय व सभोवतालचा संपूर्ण परिसर हा मुंबईतील सर्वाधिक महत्त्वाच्या ‘वारसाजतन प्रसीमा’मध्ये (हेरिटेज प्रीसिंक्ट) समाविष्ट आहे. सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असणाऱ्या या परिसरात आझाद मैदानासारखे ऐतिहासिक क्रीडांगण आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या संकल्पनेनुसार पालिका मुख्यालयासमोर असलेल्या पालिका क्रीडाभवन जागेचा पुनर्विकास करून ही ‘टाऊनहॉल जिमखाना’ इमारत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मुंबईकरांना तसेच पर्यटकांना केंद्रस्थानी ठेवून निर्णय झाला आहे. इमारतीमध्ये काचेचा घुमट (ग्लास डोम) तसेच व्हिविंग गॅलरी असेल. गॅलरीपर्यंत जाण्यासाठी काचेच्या कॅप्सूल लिफ्ट असतील. त्याचप्रमाणे छतावर रूफ टॉप कॅफटेरियाही होणार आहे.
महालक्ष्मी रेसकोर्सजवळ नवीन क्रीडाभवन
काही दिवसांपूर्वी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सध्याच्या क्रीडाभवन इमारतीला भेट देऊन पाहणी केली होती. खेळाच्या सुविधा अपुऱ्या असून वास्तू वापराविना आहे, तसेच इमारतीची सातत्याने दुरुस्ती करावी लागते. एवढेच नव्हे तर या परिसरात येऊन क्रीडाभवन, जिमखान्याचा वापर करणे कर्मचाऱ्यांना सहज शक्य होत नाही आदी बाबी निदर्शनास आल्या होत्या. कर्मचाऱ्यांसाठी हक्काचे क्रीडाभवन साकारावे, अशा सूचना त्यांनी त्यावेळी दिल्या. या क्रीडाभवनाचा जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना लाभ घेता येईल, अशी जागा निवडून तेथे क्रीडाभवन उभारण्याच्या कामाला गती द्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार महालक्ष्मी रेसकोर्सजवळील तुळशीवाडी येथे ते बांधण्याचे प्रस्तावित आहे.
अशी असेल टाऊन हॉलची इमारत
इमारत तळ अधिक पाच मजल्यांची असेल. सभोवतालच्या उच्च दर्जाच्या हेरिटेज वास्तू लक्षात घेता टाऊन हॉल इमारतीची उंची सभोवतालच्या पुरातन वारसा वास्तूंच्या उंचीइतकी समर्पक प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामुळे या पुरातन वारसा इमारतींच्या सौंदर्यास कोणतीही बाधा येणार नाही. टाऊन हॉल इमारतीमध्ये दोन तळघरांमध्ये जवळपास ६० वाहनांसाठी वाहनतळाची सुविधा असेल.