Join us  

मुंबई विमानतळावरील टर्मिनलवर काचेचे पार्टिशन, तेथून फेकले तस्करीचे सोने, अडीच किलो सोने जप्त, दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 8:54 AM

Crime News: सोन्याची तस्करी करण्याची एक नवीनच कार्यपद्धती मुंबई विमानतळावरील तपास यंत्रणांनी उघडकीस आणली आहे.

मुंबई : सोन्याची तस्करी करण्याची एक नवीनच कार्यपद्धती मुंबईविमानतळावरील तपास यंत्रणांनी उघडकीस आणली आहे. मुंबई विमानतळावर आंतरराष्ट्रीय टर्मिनल आणि देशांतर्गत टर्मिनल जिथे जोडले जाते तिथे एक काचेचे पार्टिशन आहे. तस्करीचे सोने परदेशातून आणल्यानंतर या देशांतर्गत टर्मिनलच्या बाजूला फेकले जाते. तेथे देशांतर्गत टर्मिनलच्या भागात आधीच तयारीत असलेले तस्करीतील साथीदार ते तस्करीच्या सोन्याची पाकिटे- पिशव्या हस्तगत करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

विमानतळावर तस्करी करून आणलेले सोने त्या परदेशी नागरिकाने पार्टिशनवरून देशांतर्गत टर्मिनलमध्ये फेकले व तेथे आधीच असलेल्या त्याच्या दोन साथीदारांनी ते घेऊन कोईंबतूर येथे जाण्याची तयारी सुरू केली.  मात्र, या हालचाली संशयास्पद आढळून आल्याने विमानतळावरील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) व सीमा शुल्क विभागाने पाळत ठेवली होती. त्यांनी संबंधितांना ताब्यात घेत या पाऊचेंस- पिशव्यांमध्ये तब्बल अडीच किलो सोने असल्याचे आढळले. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत १ कोटी ३० लाख रुपये इतकी आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांमध्ये जलाल जलालुद्दीन व साजिथा बेगम यांचा समावेश आहे.अशी घडली हेराफेरी...  जलाल जलालुद्दीन व साजिथा बेगम या हे दोघेजण मुंबई विमानतळावरून कोईम्बतूर येथे जाण्यासाठी विमान पकडण्यासाठी देशांतर्गत टर्मिनलमध्ये आले.   टर्मिनलमध्ये प्रवेश केल्यानंतर ते तिसऱ्या मजल्यावरील गेट क्रमांक ८६ व ८७ या दरम्यान फेऱ्या मारत होते. या दोन गेटमध्ये एक काचेची पार्टिशन असून एका बाजूला आंतरराष्ट्रीय टर्मिनल आहे, तर दुसऱ्या बाजूला देशांतर्गत टर्मिनल आहे.   हे दोघे तिथे संशयास्पदरीत्या घुटमळत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सीआयएसएफ आणि सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर व्यक्तीशः व सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाळत ठेवली.   थोड्याच वेळात आंतरराष्ट्रीय टर्मिनलच्या दिशेने काळ्या रंगाची काही पाऊच देशांतर्गत टर्मिनल परिसरात फेकली गेली. ती पाकिटे ज्यावेळी या दोघांनी उचलली त्याचवेळी अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत त्याची तपासणी केली. तेव्हा त्यात अडीच किलो वजनाची सोन्याची पावडर आढळून आली.   या दोघांना अटक करण्यात आली आहे. ही पाकिटे आंतरराष्ट्रीय टर्मिनल येथून कुणी, कशी फेकली याचा पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :सोनंमुंबईविमानतळगुन्हेगारी