मुंबई विद्यापीठाला ‘ग्लोबल एज्युकेशन’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 06:05 AM2019-08-21T06:05:31+5:302019-08-21T06:05:45+5:30

प्रत्येक सत्रातील ४५०पेक्षा अधिक परीक्षांच्या संपूर्ण मूल्यांकनाची प्रक्रिया ‘ओएसएम’ पद्धतीद्वारे करणारे मुंबई विद्यापीठ हे भारतातील एकमेव विद्यापीठ असल्याने ते या पुरस्कारासाठी पात्र ठरले.

 'Global Education' award to the University of Mumbai | मुंबई विद्यापीठाला ‘ग्लोबल एज्युकेशन’ पुरस्कार

मुंबई विद्यापीठाला ‘ग्लोबल एज्युकेशन’ पुरस्कार

googlenewsNext

मुंबई : उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्याबद्दल मुंबई विद्यापीठाला राष्ट्रीय पातळीवरील ‘ग्लोबल एज्युकेशन पुरस्कार - २०१९’ प्राप्त झाला आहे. राजस्थानातील उदयपूर येथे झालेल्या ग्लोबल एज्युकेटर फेस्टिव्हलमध्ये सोनम वायचुंग व लक्षराजसिंग मेवाड यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्यापीठातर्फे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी तो स्वीकारला.
मुंबई विद्यापीठाने २०१७ साली उन्हाळी सत्राच्या परीक्षांपासून सर्व परीक्षांसाठी संगणकाधारीत मूल्यांकन पद्धत म्हणजेच (आॅनस्क्रीन मार्किंग) सुरू केली. प्रत्येक परीक्षेला जवळपास १३ ते १६ लाख उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करून, त्याचे शिक्षकांमार्फत आॅनलाइन मूल्यांकन करून घेतले. प्रत्येक सत्रातील ४५०पेक्षा अधिक परीक्षांच्या संपूर्ण मूल्यांकनाची प्रक्रिया ‘ओएसएम’ पद्धतीद्वारे करणारे मुंबई विद्यापीठ हे भारतातील एकमेव विद्यापीठ असल्याने ते या पुरस्कारासाठी पात्र ठरले.

म्हणून मिळाला पुरस्कार...
‘ओएसएम’बरोबरच मुंबई विद्यापीठाकडून सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका ‘डिजिटल पेपर डिलिव्हरी’मार्फत ८१९पेक्षा जास्त महाविद्यालयांना प्रश्नपत्रिका आॅनलाइन पाठविली जाते. प्रश्नपत्रिका छपाईचा, वाहतुकीचा खर्च व वेळ यातून वाचला जातो, तसेच सुरक्षितरीत्या या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वी महाविद्यालयाकडे पोहोचतात. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रत्येक प्रश्नपत्रिकेवर त्या-त्या महाविद्यालयाचे नाव छापले जाते, तसेच आॅनलाइन पुनर्मूल्यांकन, आॅनलाइन पीएच.डी प्रवेश परीक्षा, आॅनलाइन परीक्षा अर्ज, आॅनलाइन प्रवेश, आॅनलाइन संलग्नता अशा अनेक तंत्रज्ञानयुक्त सोईसुविधा मुंबई विद्यापीठाने केल्या आहेत व करीत आहे. यामुळेच हा पुरस्कार प्राप्त झाला असल्याचे सांगण्यात आले.

तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून मुंबई विद्यापीठांतर्गतच्या विद्यार्थी, शिक्षक व महाविद्यालयांना सर्व सोईसुविधा उपलब्ध करून देणे, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रशासनात गतिमानता आणणे हाच उद्देश आहे. भविष्यातही अनेक सुविधा तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उपलब्ध करून दिल्या जातील.
- डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ.

Web Title:  'Global Education' award to the University of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.