- राहुल रनाळकरवसभर थकून घरी पोहोचल्यानंतर अर्धा तास का होईना एखादे चॅनल टीव्हीवर पाहायचे झाल्यास अनेक जण वन्यजिवांशी संबंधित चॅनेल किंवा पर्यटनाशी संबंधित चॅनल पाहणे पसंत करतात. अनेकदा इच्छा असून पर्यटन करणे शक्य होत नाही, हादेखील अनेकांचा अनुभव असेल. मग ते कधी वेळेअभावी किंवा कधी आर्थिक जुळवाजुळवीअभावी. भटकंतीची आवड असणारे लोक अलीकडे ट्रॅव्हल एक्सपी चॅनेल पाहतात. हे चॅनल कोणत्याही वेळी लावले तरी अत्यंत सुखद अशी भटकंती बसल्याजागी आपल्याला ते हमखास घडवून आणते.या चॅनेलमधील एपिसोड्स पाहिल्यावर हे चॅनल नक्कीच यूएस किंवा यूकेस्थित असावे, असाच काहीसा समज सगळ्यांचा होईल. यास कारण म्हणजे या चॅनेलवरच्या प्रत्येक एपिसोडचा दर्जा अतिशय उच्च असतो. शिवाय यातील डेस्टिनेशन्सही अफलातून असतात. अलीकडेच या चॅनेलच्या सीईओंना भेटण्याचा योग जुळून आला. या सीईओंचे नाव प्रशांत चोथानी. एवढ्या मोठ्या चॅनेलचे सीईओ मुंबईत येत आहेत, तर त्यांना भेटण्याची उत्सुकता होती. अतिशय साधे आणि निगर्वी व्यक्तिमत्त्व असलेल्या प्रशांत यांच्याशी सुरुवातीच्या काही मिनिटांतच घनिष्ठ मैत्री असल्याचे वाटू लागले. हिंदी आणि अधूनमधून मराठीत सहज संवाद साधणाऱ्या प्रशांत यांच्याशी थोडा वेळ औपचारिक बोलणे झाल्यावर सहज प्रश्न केला, ‘आपके चॅनेल के मालिक यूएस बेस्ड है, की यूके?’ या प्रश्नाचे उत्तर अधिक बुचकाळ्यात टाकणारे होते. ‘चॅनेल का मालिक मै ही हू, और ये चॅनेल मुंबई-अंधेरी बेस्ड है’. त्यानंतर पुढची दोन मिनिटे अवाक् होण्याशिवाय अन्य काहीही पर्याय नव्हता. जे चॅनेल पाहिल्यानंतर सुखाची झोप लागते, असा माझा स्वत:चा अनुभव आहे त्याच चॅनेलच्या मालकाशी थेट आपण संवाद साधतोय, यावर विश्वास ठेवणे थोडे कठीण होते. सध्या जगभर गाजत असलेल्या ट्रॅव्हल एक्सपी या चॅनेलचे हेडक्वार्टर अंधेरीत असल्याचे कळाले आणि मुंबईकर असल्याचा अभिमानही अनाहूतपणे जागृत झाला. त्यानंतर प्रशांत चोथानी यांचे बोलणेही अधिक खुलत गेले.प्रशांत हे गेल्या ३० वर्षांपासून ब्रॉडकास्टिंग उद्योगाशी संबंधित आहेत. साधारण १९८८च्या सुमारास केबल उद्योगाला अधिकृत उद्योगाचा दर्जा मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. ट्रॅव्हल एक्सपी या देशातील पहिल्या एचडी चॅनेलची सुरुवात त्यांनी २०११मध्ये केली. सध्या हे चॅनेल जगभर ९१ मिलियन घरांमध्ये पाहिले जाते. ट्रॅव्हल एक्सपीच्या शिरपेचात मानाचा तुरा अलीकडेच रोवला गेला. युरोपच्या मेनस्ट्रीम चॅनेलमध्ये फ्री व्ह्यू लिस्टमध्ये ट्रॅव्हल एक्सपीने स्थान मिळविले आहे; तेदेखील जगातील पहिले ‘फोर के एचडीआर’ चॅनेल म्हणून घेतलेली एन्ट्री विस्मयकारक आहे. ‘फोर के एचडीआर’ ट्रॅव्हल एक्सपी चॅनेल उत्तर अमेरिका, युरोप, ‘मिना’ आणि एशिया पॅसिफिक देशांमध्ये दिसू लागले आहे. जागतिक स्तरावर हे अस्सल भारतीय चॅनेल डिस्कव्हरीला टक्कर देत आहे. प्रशांत यांच्या म्युझिक इंडिया, संगीत बांगला, संगीत मराठी, संगीत भोजपुरी या चॅनेलचाही मोठा प्रेक्षकवर्ग आहे.ट्रॅव्हल एक्सपीची खासियत म्हणजे या चॅनेलच्या अर्ध्या तासाच्याएका एका एपिसोडसाठी सुमारे ८ ते ९ महिने संपूर्ण टीम कार्यरत असते. अंधेरीतील मुख्यालयात प्री-पोस्ट प्रोडक्शनची कामे चालतात. त्यांचा जर्मनीत जर्मनमध्ये, इटलीत इटालियन याप्रमाणे ज्या-ज्या देशांत हे चॅनेल दिसते तेथील स्थानिक भाषेत या चॅनेलचे प्रोग्राम डब केले जातात. पण या चॅनेलवर ५० टक्के कन्टेंट हा भारतातील पर्यटनस्थळांचा असतो. त्यामुळे एक प्रकारे हे आपल्या देशातील स्थळांचे परदेशातील ब्रॅडिंग ठरते.प्रशांत यांच्या संदर्भातील अजून एक बाब महत्त्वाची आहे. त्यांचे शालेय शिक्षण नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे झाले आहे. या गावाच्या अनेक आठवणी त्यांच्याकडे आहेत. या गावाची ओळख जगभर व्हावी, ही त्यांची इच्छा त्यांनी बोलून दाखविली. मँगो फेस्टिव्हल किंवा आॅरेंज फेस्टिव्हल अलीकडे होतात; तसाच ओनियन फेस्टिव्हल घडवून आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. बरे या विचारावर केवळ ते थांबले नाहीत, तर गेल्या दोन वर्षांपासून या संकल्पनेवर ते काम करीत आहेत. कांद्याच्या लागवडीपासून ते कांद्याच्या मार्केटिंगपर्यंतचे टप्पे त्यांना जगासमोर आणायचे आहेत. कांद्याचा प्रवास पाहण्यासाठी जगभरातील लोकांनी लासलगावला येऊन काही दिवस राहावे, शेतकºयांसोबत शेतात जावे आणि अनुभव घ्यावा अशी त्यांची इच्छा आहे. लासलगावचे बॅ्रडिंग जगभर सकारात्मकरीत्या करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.(लेखक मुंबई आवृत्तीत शहर संपादक आहेत.)
अस्सल मुंबईकराची ‘नयनरम्य’ ग्लोबल भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 4:58 AM