भारतीय बनावटीच्या सफर मॉडेलला जागतिक स्तरावर मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:06 AM2021-09-23T04:06:58+5:302021-09-23T04:06:58+5:30

मुंबई : सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च’च्या (सफर) दिल्ली, मुंबई, पुणे आणि अहमदाबाद शहरांत सध्या ...

Global recognition of Indian-made Safar model | भारतीय बनावटीच्या सफर मॉडेलला जागतिक स्तरावर मान्यता

भारतीय बनावटीच्या सफर मॉडेलला जागतिक स्तरावर मान्यता

Next

मुंबई : सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च’च्या (सफर) दिल्ली, मुंबई, पुणे आणि अहमदाबाद शहरांत सध्या कार्यरत असलेल्या हवा गुणवत्ता पूर्वानुमान देणाऱ्या स्वदेशी मॉडेलला आता जागतिक स्तरावर मान्यता मिळत आहे. हे मॉडेल सर्व नॉन अटेन्मेन्ट शहरांसाठी वापरणे राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती आराखड्यांतर्गत बंधनकारक असून, इतर शहरांसाठीही तंतोतंग लागू करता येईल.

राज्यात १८ नॉन अटेन्मेन्ट शहरे आहेत. सफरच्या मॉडेलचे निष्कर्ष, निरीक्षणे असलेला शोधनिबंध एल्सेविअर जर्नल - एन्व्हायर्मेंटल मॉडेलिंग अँड सॉफ्टवेअर या आंतरराष्ट्रीय पीअर-रिव्ह्यू जर्नलमध्ये २१ सप्टेंबरला प्रकाशित झाला. इंडियाज मेडन एअर क्वालिटी फोरकास्टिंग फॉर मेगासिटीज ऑफ डायव्हर्जन्ट एन्व्हायर्मेंट्स - द सफर प्रोजेक्ट या शीर्षकाखाली हा शोधनिबंध असून, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटरोलॉजी (आयआयटीएम पुणे) यांच्या नेतृत्वाखाली, भारतीय हवामान विभाग आणि उत्कल युनिव्हर्सिटी, भुवनेश्वर यांच्यासोबत मांडण्यात आला. केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाने नागरिक, निर्णयकर्ते आणि संशोधकांसाठी तयार केलेली सफरची हवा गुणवत्ता पूर्वानुमान यंत्रणा सध्या चार शहरांत कार्यरत आहे.

पूर्वानुमान मॉडेल ही हवेच्या गुणवत्तेचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने एकत्रित उपाययोजना देणारी यंत्रणा आहे. तसेच हे मॉडेल प्रदूषणाचे धोके कमी करण्यासाठी उपाय सुचविणारे असून, स्थानिक पातळीवर देखील स्वच्छ हवा आराखडा करण्यास मदत करते. सफरचे पुर्वानुमान मॉडेल हे युनायटेड स्टेट्स एन्व्हायर्मेंट प्रोटेक्शन एजन्सीच्या (युएस-इपीए) मॉडेलशी तुलना करण्यायोग्य आहे. हवेच्या गुणवत्तेबाबत इशारा देताना महानगरांमध्ये स्थानिक पातळीपर्यंत पर्यावरणाचा सूक्ष्म पातळीवर विचार करत प्रदूषक घटकांचे पूर्वानुमान मांडणे हा यातील महत्त्वाचा भाग आहे.

- डॉ. गुरफान बेग, संस्थापक, सफर

मॉडेल तंतोतंत लागू करणे शक्य

राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती आराखड्यांतर्गत देशामध्ये सध्या १३२ नॉन अटेन्मेन्ट शहरे असून, २०२४ पर्यंत तेथील पार्टिक्यूलेट मॅटरचे (पीएम) कॉन्सन्ट्रेशन २० ते ३० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी २०१७ हे आधारभूत वर्ष म्हणून ठरविले आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ठरवून दिलेल्या विहीत हवा गुणवत्ता निकषांची पूर्तता न होणारी शहरे ही नॉन अटेन्मेन्ट शहरे म्हणून ओळखली जातात.

आयुष्याची नऊ वर्षे कमी

राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती आराखड्यानुसार राज्यातील १८ शहरांचा समावेश नॉन अटेन्मेन्ट शहरे म्हणून केला आहे. शिकागो विद्यापीठाच्या एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटने (इपीआयसी) अलीकडेच २०१९ मध्ये एअर क्वालिटी लाईफ इंडेक्स - हवेचा गुणवत्ता जीवनमान निर्देशांक जाहीर केला आहे. त्यानुसार हवेचे प्रदूषण हे सुमारे चाळीस टक्के भारतीय नागरिकांच्या आयुष्याची नऊ वर्षे कमी करत आहे.

स्वच्छ हवा कृती आराखडा

दिल्ली, मुंबई, पुणे आणि अहमदाबाद या चार वेगवेगळ्या वातावरणाच्या शहरांसाठी सफरने यापूर्वीच पूर्वानुमान मॉडेल विकसित केले आहे. देशातील उर्वरित १२८ नॉन अटेन्मेन्ट शहरांसाठी देखील हेच प्रारूप वापरता येईल. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती आराखडा हा भारतीय शहरांसाठी पूर्वानुमानाच्या मॉडेलवर भर देतो. नेमका याच मुद्यांचा विचार केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाच्या सफर प्रकल्पामध्ये दिसून येतो.

प्रदूषणाची स्थिती

पीएम २.५ चे सर्व स्रोताद्वारे होणारे एकूण उत्सर्जनाचे प्रमाण (२०१९-२० या वर्षातील)

दिल्ली ७७ जिगाग्रॅम्स प्रतिवर्ष

अहमदाबाद ५७ जिगाग्रॅम्स प्रतिवर्ष

मुंबई ४५ जिगाग्रॅम्स प्रतिवर्ष

पुणे ३० जिगाग्रॅम्स प्रतिवर्ष

--------------------------

पीएम २.५ च्या उत्सर्जनामध्ये वाहतूक क्षेत्राचा वाटा

दिल्ली ४१ टक्के

पुणे ४० टक्के

अहमदाबाद ३५ टक्के

मुंबई ३१ टक्के

--------------------------

जैव इंधनामुळे उत्सर्जनाचे प्रमाण

मुंबई १५.५ टक्के

पुणे ११.४ टक्के

अहमदाबाद १०.२ टक्के

दिल्ली ३ टक्के

--------------------------

उद्योगधंद्यांमुळे उत्सर्जन

मुंबई ३१.१ टक्के

पुणे २१.६ टक्के

अहमदाबाद १८.८ टक्के

दिल्ली १८.६ टक्के

--------------------------

Web Title: Global recognition of Indian-made Safar model

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.