Global Vipassana Pagoda : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५ ते ७ डिसेंबर पॅगोडा बंद!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 11:02 PM2021-12-03T23:02:14+5:302021-12-03T23:02:53+5:30
Global Vipassana Pagoda : अनुयायांनी या तीन दिवसांदरम्यान येथे प्रत्यक्ष न येता, आपापल्या घरुनच अभिवादन करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी ६ डिसेंबर रोजी दरवर्षी गोराई येथील ‘ग्लोबल पॅगोडा’ येथे मोठ्या संख्येने अनुयायी येत असतात. मात्र, कोरोनाचा नवीन प्रकार ओमायक्रॉनचा प्रसार जगभरात वाढत असल्याने खबरदारीसाठी ५ ते ७ डिसेंबरदरम्यान ‘ग्लोबल पॅगोडा’ बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे अनुयायांनी या काळात ग्लोबल पॅगोडा येथे येऊ नये असे आवाहन पालिका उप आयुक्त (परिमंडळ - ७) डॉ. भाग्यश्री कापसे यांनी केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने महापालिकेच्या ‘आर मध्य’ विभाग कार्यालयात विविध संघटनांसमवेत एका विशेष बैठकीचे आयोजन नुकतेच करण्यात आले. उप आयुक्त डॉ. कापसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीला ‘आर मध्य’ विभागाचे सहाय्यक आयुक्त हफीज वकार जावेद मन्सुर अली, ‘ग्लोबल पॅगोडा’ चे व्यवस्थापक एस. एस. शिंदे, संबंधित पोलिस निरिक्षक रविंद्र आव्हाड, पोलिस उप निरिक्षक (वाहतूक) संजय सावंत, विभागाचे कार्यकारी अभियंता निवृत्ती गोंधळी यांच्यासह पालिकेचे संबधित अधिकारी आणि ‘ग्लोबल पॅगोडा’ चे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत खबरदारीची उपाययोजना म्हणून रविवार ५ ते मंगळवार ७ डिसेंबर २०२१ या तीन दिवसांच्या कालावधीत ‘ग्लोबल पॅगोडा’ बंद ठेवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. अनुयायांनी या तीन दिवसांदरम्यान येथे प्रत्यक्ष न येता, आपापल्या घरुनच अभिवादन करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.