मनोरंजन विश्वावर गुन्हेगारीच्या उदात्तीकरणाचे सावट!
By संजय घावरे | Published: February 21, 2024 08:33 PM2024-02-21T20:33:19+5:302024-02-21T20:33:44+5:30
मनोरंजन विश्वावर सध्या गुन्हेगारीच्या उदात्तीकरणाचे सावट असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मुंबई - चित्रपटांपासून वेब सिरीजपर्यंत मनोरंजन विश्वात हिंसाचाराने परीसीमा गाठली आहे. अशातच समाज आणि न्यायव्यवस्थेसमोर खलनायक म्हणून समोर आलेली व्यक्तिमत्त्वांवर कलाकृती बनवल्या जात आहेत. मनोरंजन विश्वावर सध्या गुन्हेगारीच्या उदात्तीकरणाचे सावट असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीवरील माहितीपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच आरोपीवरील माहितीपट प्रदर्शित होणे योग्य नसल्याने सीबीआयने आक्षेप घेतला. न्यायालयाने स्थगितीस नकार दिल्याने 'दि इंद्राणी मुखर्जी स्टोरी'चा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक गुन्ह्यांचा छडा लावत गुन्हेगारांना कोठडीचा मार्ग दाखवणाऱ्या तपास यंत्रणेला आरोपीवरील माहितीपटासाठी अशा प्रकारे स्थगिती मागावी लागल्याने या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. आजवर मन्या सुर्वे, दाऊद इब्राहिम, हसीना पारकर, अरुण गवळी, तेलगी, हर्षद मेहता आदी बऱ्याच जणांवर सिनेमे आणि वेब सिरीज बनल्या आहेत. इतके सिनेमे एखाद्या महापुरुषावरही बनलेले नाहीत. अशा कलाकृती समाजावर कोणते संस्कार हा प्रश्न ऐरणीवर आहे. यावर 'एक थी बेगम' या हिंदी वेब सिरीजचे लेखक-दिग्दर्शक सचिन दरेकर 'लोकमत'शी बोलताना म्हणाले की, खटला न्यायप्रवीष्ट असल्याने जनमानसात इंद्राणी मुखर्जीबाबत सहानुभूती निर्माण होऊ नये यासाठी सीबीआयचा आक्षेप होता. प्रेक्षकांना अशा कलाकृती बघायला आवडतात. कारण प्रत्येकामध्ये कुठेतरी कली किंवा खल दडलेला असतो, जो आई-वडीलांचे संस्स्कार आणि समाजातील जडणघडणीमुळे दबलेला असतो. त्यामुळे तो पडद्यावर बघायला लोकांना आवडतो. जे प्रत्यक्षात करता येत नाही, ते पडद्यावर बघण्याची मानसिकता आणि त्याचे आकर्षण असल्याने गुन्हेगारी विश्वावरील प्रोजेक्टसना पसंती मिळत आहे. गुन्हेगारीच्या उदात्तीकरणाबाबत बोलायचे तर संत तुकाराम महाराजांवरील मालिका पाहून समाज सुधारतही नसल्याचे दरेकर म्हणाले.
२० टक्के कोल्ड ब्लडेड क्रिमिनल्स
८० टक्के गुन्हे राग, द्वेष, संतापाच्या प्रसंगी उफाळून आलेल्या भावनेच्या अनियंत्रीत क्षणी घडतात. त्यामुळे आपली न्यायव्यवस्था शिक्षा देण्यापेक्षा आरोपींच्या सुधारणेला वाव देते. २० टक्केच कोल्ड ब्लडेड क्रिमिनल्स आहेत.
- प्रवीण दीक्षित (निवृत्त पोलिस महासंचालक)
हिंसाचार व लैंगिकता या दोन गोष्टींवर आधारीत सिनेमे, वेब सिरीज, नाटक बनवणे हे पैसे मिळवण्याचे प्रमुख साधन बनते, तेव्हा ते समाज रसातळाला जात असल्याचे द्योतक आहे. अनुभवावर आधारीत समाजाचे भले होईल हेच लिहायचे हा सुसंस्कृत समाजाचा दंडक आहे. रसिकांनीच या अपप्रवृत्तींवर आवाज उठवून त्याचा जाहीर निषेध करणे आवश्यक आहे.
- सचिन दरेकर (लेखक, दिग्दर्शक)
गुन्हेगारांवरील कलाकृती बघून प्रेक्षक त्यांच्यातील सुप्त कलीला समाधानी करत असतात असं वाटतं. याचा समाजावर वाईट परिणाम होता कामा नये. या गोष्टी कुठल्या वयात बघितल्या जातात यावर संस्कार अवलंबून असतात. संस्कार होण्याच्या कोवळ्या वयात जर हे बघितले तर ते चुकीचे आहे. मुले काय बघतात यावर पालकांनी लक्ष आणि नियंत्रण ठेवायला हवे.