मुंबई: पोलीस दलात गुणवत्तापूर्ण व उल्लेखनीय सेवा बजाविल्याबाबत मुंबई पोलीस दलातील १०० अधिकारी-अंमलदारांचा मंगळवारी गौरव करण्यात आला. महाराष्टÑ दिनाचे औचित्य साधून पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते महासंचालकांकडून घोषित झालेल्यांना सन्मान चिन्हांचे वितरण करण्यात आले.नायगाव येथील पोलीस मैदानावर संचलन करण्यात आले. त्यानंतर पोलीस संकुल सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी १०० गौरव मूर्तींपैकी गुन्हा अन्वेषण शाखेतील निरीक्षक सुधीर कालेकर व उपनिरीक्षक विजय आंबेकर यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदकाचे वितरण करण्यात आले. अन्य ९८ अधिकारी व अंमलदारांना २०१७ या वर्षाचे सन्मानचिन्ह (इन्सीग्निया) कार्यक्रमात बहाल करण्यात आले. त्यामध्ये एक वरिष्ठ निरीक्षक, ७ निरीक्षक, २ सहाय्यक निरीक्षक, ११ उपनिरीक्षक, २ सहाय्यक फौजदार, ४५ हवालदार, १८ नाईक, १० कॉन्स्टेबलचा समावेश होता. पोलीस दलात गुणवत्तापूर्ण व उल्लेखनीय सेवा बजाविल्याबाबत तसेच नागरिकांच्या संरक्षणार्थ सातत्याने काम केल्याबद्दल त्यांना गौरवण्यात आले.यावेळी व्यासपीठावर सहआयुक्त अर्चना त्यागी, संजय सक्सेना, देवेन भारती, आशुतोष डुंबरे व रितेशकुमार उपस्थित होते.
मुंबईतील १०० पोलिसांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 6:43 AM