मालक राजेंद्र साही यांच्यावरही निष्काळजीपणाचा ठपका
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तौक्ते चक्रीवादळामध्ये बुडालेल्या वरप्रदा टग बाेटप्रकरणी येलोगेट पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. वरप्रदाची योग्य काळजी घेतली असती तर दुर्घटना टळली असती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे निष्काळजीपणाचा ठपका ठेवत, वरप्रदा टग बाेटची कंपनी ग्लोरी शिप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि कंपनी मालक राजेंद्र साही यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला.
तौक्ते चक्रीवादळामुळे ओएनजीसी साऊथ फिल्ड भागात कामासाठी नियुक्त असलेली वरप्रदा टग बाेट समुद्रात भरकटून बुडाली. त्या वेळी बाेटीवर १३ कर्मचारी होते. त्यापैकी दाेघांना वाचविण्यात यश आले हाेते, तर ८ जणांचे मृतदेह दमण, गुजरात तसेच महाराष्ट्राच्या समुद्रकिनारी आढळले. यापैकी ३ कर्मचारी अजूनही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.
वरप्रदा टग बाेटची कंपनी ग्लोरी शिप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि कंपनी मालक राजेंद्र साही यांनी जाणीवपूर्वक वरप्रदाची कोणतीच दुरुस्ती किंवा देखभाल केली नव्हती, त्यामुळेच चक्रीवादळात बाेट बुडून क्रू मेंबरच्या मृत्यूस कारणीभूत ठरली, अशी माहिती या दुर्घटनेतून वाचलेले सेंकड इंजिनीअर फ्रान्सिस के. सायमन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून समाेर आली आहे. त्यानुसार पाेलिसांनी कंपनीसह मालकावर गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, यापूर्वी तौक्ते चक्रीवादळादरम्यान अरबी समुद्रात बार्ज पी-३०५ बुडाल्या प्रकरणी कॅप्टन राकेश बलवंत यांच्यावर येलोगेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या दुर्घटनेत राकेश यांच्यासह ७१ मृतदेह मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ८ बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध अजूनही सुरू आहे.
.............................................
.............................................................................