मुंबई : विधानभवन मार्गावरील आणि एअर इंडिया इमारतीच्या समोरील खाऊगल्लीतील विक्रेत्यांकडून हातमोज्यांचा वापर न करता, खाद्यपदार्थांची विक्री केली जात आहे. या विक्रेत्यांना अन्न व औषध प्रशासन (एफडीए) यांनी नुकत्याच हातमोजे परिधान करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, या सूचनेचे पालन खाऊगल्लतील विक्रेत्यांकडून केले जात नाही.
अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नुकतेच विधानभवन मार्गावरील आणि एअर इंडिया इमारतीच्या समोरील खाऊगल्लीतील स्टॉलची तपासणी केली. यामध्ये दोन्ही ठिकाणी मिळून एकूण ५५ स्टॉल्सची तपासणी केली. यावेळी अन्न व्यावसायिकांनी व्यवसाय करताना वैयक्तिक स्वच्छता राखावी. व्यवसायाच्या वेळी हातमोजे, अॅप्रन आणि डोक्यावर टोपी वापरावी, अशा सूचना एफडीएने दिल्या होत्या. मात्र, दोन्ही ठिकाणच्या खाऊगल्लीतील विक्रेत्यांनी अॅप्रन आणि डोक्यावर टोपी घातली होती. मात्र, कोणत्याही विक्रेत्यांच्या हातात हातमोजे घातले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे एफडीएच्या नियमावलीचे उल्लंघन केले असून, ग्राहकांना सुरक्षित अन्न मिळते का? असा प्रश्न खवय्यांना पडला आहे.
एफडीएच्या तपासणीत अन्न व्यावसायिकांनी परवाना घेऊनच व्यवसाय करावा, असे निर्देश एफडीएकडून दिले आहेत. ग्राहकांना सुरक्षित अन्न द्यावे, याबाबतही अन्न व्यावसायिक यांना निर्देश दिले. मात्र, हातमोजे नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. एकाच पाणीपुरीवाल्याच्या हातात हातमोजे दिसून आले.एफडीच्या मोहिमेंतर्गत पाणीपुरी, भेळपुरी, चहाचे स्टॉल, उसाचा रस, फ्रूट ज्यूस, वडापाव, अंडाभुर्जी, आॅम्लेट, चायनीज, पान विडी स्टॉल, पावभाजी, नारळपाणी, झुणका-भाकर केंद्र, सँडविच स्टॉल, पोळीभाजी, लस्सी स्टॉल, बिर्याणी, मॅगी, चणा मसाला, साउथ इंडियन डोसा, मस्कापाव सेंटर, फ्रूट सलाड, कबाब चिकन या स्टॉल्सची तपासणी केली.