प्रवाशांचे हाल : केबिन क्रू उपलब्ध नसल्याने गो-एअर कंपनीची १८ विमाने रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 03:02 AM2019-12-24T03:02:20+5:302019-12-24T03:02:41+5:30
प्रवाशांचे हाल; कमी दृश्यमानता व आंदोलनावर कंपनीचा ठपका
मुंबई : विमानाच्या आतील कर्मचारी (केबिन क्रू) नसल्याने गोएअर कंपनीला सोमवारी १८ विमाने रद्द करावी लागली आणि प्रवाशांना त्याचा खूप त्रास सहन करावा लागला. विमाने रद्द तर झालीच, पण अनेक विमाने विलंबाने निघाली. त्याची पूर्वकल्पना देण्यात आली नाही, अशी प्रवाशांची तक्रार आहे.
गोएअरचे दर अन्य विमान कंपन्यांपेक्षा कमी असतात. त्यामुळे असंख्य प्रवासी गोएअरने प्रवास करतात. ही कंपनी सध्या ए-३२0 निओ पद्धतीच्या विमानांतील तांत्रिक अडचणींचा सामना करीत आहे. त्यातच केबिन क्रू नसल्याने विमाने रद्द करावी लागल्याने गोएअरवर नामुष्कीची वेळ आली आहे. मुंबई, गोवा, बंगळुरू, दिल्ली, श्रीनगर, पाटणा, जम्मू, इंदूर व कोलकाता येथील विमाने रद्द करण्यात आली.
कंपनीने काही विमाने रद्द केल्याचे मान्य केले. मात्र, केबिन क्रू उपलब्ध नसल्याने विमाने रद्द करावी लागली, असे कंपनीने म्हटलेले नाही. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात काही ठिकाणी सुरू असलेली आंदोलने, धुक्यामुळे येणाऱ्या अडचणी ही विमाने रद्द करावी लागण्याची कारणे आहेत, असे कंपनीने म्हटले आहे. त्यातच कर्मचाऱ्यांच्या कामांच्या तासांच्या मर्यादेमुळेही विमानांच्या उड्डाणांमध्ये अडचणी येत आहेत, असे प्रवक्त्याने सांगितले.
प्रवाशांना होणाºया त्रासाची आम्हाला कल्पना आहे, पण तो त्रास कमी व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे तो म्हणाला.
पर्यायी व्यवस्थेचे आश्वासन
प्रवाशांसाठी आम्ही पर्यायी विमानाची व्यवस्था होते का, हे तपासत आहोत. ज्यांची विमाने रद्द झाली, त्यांना संपूर्ण रक्कम देणे व नव्या विमानाने जाण्यासाठी बुकिंग करीत आहोत, असे गोएअर प्रवक्ता म्हणाला.