मुंबई : आपल्या राज्यात लोकशाही आहे आणि त्यामुळेच दहावीला ४२ टक्के पडलेला माणूस आज तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आला आहे. त्यामुळे लोकशाही कशाला म्हणतात हे तुम्हाला कळले असेल. याउपर तुम्ही सुज्ञ आहात, अशी मिश्कील टिप्पणी करताना देशात कुठेही जा पण मनात महाराष्ट्राचा विचार कायम ठेवा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी यूपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना केले.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा प्रभादेवी येथे झाला. यावेळी मार्गदर्शन करताना ठाकरे म्हणाले, राज्यात मुख्यमंत्री येत-जात असतात तुम्ही तुमची बलस्थाने ओळखा. प्रत्येकाच्या मनात स्वतःच्या राज्याविषयी प्रेम असते. उद्या तुम्ही देशाच्या काना-कोपऱ्यात जाल, पण महाराष्ट्राचा विचार तुमच्या मनातून जाता कामा नये.
बीएमडब्लूचा प्रकल्प महाराष्ट्रातून गेला
विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना बीएमडब्ल्यू कारखाना महाराष्ट्रात येणार होता. काही कारणास्तव देशमुखांना कंपनीच्या शिष्टमंडळासोबतच्या बैठकीला उपस्थित राहता येणार नव्हते. त्यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्याला बैठकीला पाठवले. ते अधिकारी दाक्षिणात्य होते. त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांसमोर नन्नाचा पाढा लावला. बीएमडब्ल्यूचे अधिकारी निराश झाले. त्यानंतर त्या अधिकाऱ्याने त्याच्या तमीळ सहकाऱ्याला फोन लावत बीएमडब्ल्यूच्या लोकांचे नंबर दिले. त्यानंतर तो प्रकल्प तामिळनाडूत गेल्याची आठवण राज यांनी सांगितली.