मेट्रोने जा... कधीही लागणार नाही लेटमार्क, १८ सेवांची वाढ, १० मिनिटांनी धावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 11:47 AM2022-08-17T11:47:24+5:302022-08-17T11:48:04+5:30
Metro : या आझादी एक्स्प्रेसच्या दर्शनी भागांवर छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्रातले गड किल्ले आणि इतर ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अनेक स्मारकांची चित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत.
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रोचे जाळे वाढविण्यावर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिकाधिक जोर देत असून, तूर्तास मुंबईच्या पश्चिम उपनगरात सुरू करण्यात आलेल्या मेट्रो मार्गांवर जास्तीत जास्त सेवा देण्याचा निर्धार प्राधिकरणाने केला आहे आणि त्यानुसार, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मेट्रोच्या सेवेत दाखल करण्यात आलेल्या आझादी एक्स्प्रेसमुळे १८ सेवांची भर पडणार आहे, तसेच दर १२ मिनिटांनी धावणारी मेट्रो आता दर १० मिनिटांनी धावणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकारण आणि महा मुंबई मेट्रोमार्फत घरोघरी तिरंगा या संकल्पेनवर आधारित तिरंगा रंगात सजवलेल्या आझादी एक्स्प्रेसला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुरदृश्यप्रणालीद्वारे हिरावा कंदिल दाखविला आणि त्यानंतर ही आझादी एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. यावेळी अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास उपस्थित होते.सध्या कार्यरत असलेल्या मेट्रोच्या ताफ्यात रुजू होणाऱ्या नव्या मेट्रोचे नाव आझादी एक्स्प्रेस आहे. या आझादी एक्स्प्रेसच्या दर्शनी भागांवर छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्रातले गड किल्ले आणि इतर ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अनेक स्मारकांची चित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत.
आझादी एक्स्प्रेसमुळे मेट्रो सेवा होणार १७२
भूषण गगराणी म्हणाले, भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृतीला उजाळा देणाऱ्या, तसेच महाराष्ट्राचे सौंदर्य दर्शवणाऱ्या आझादी एक्स्प्रेसचे पावित्र्य प्रवाशांनी स्वच्छता राखून जपावे. एस.व्ही. आर श्रीनिवास म्हणाले, मेट्रोच्या ताफ्यात रुजू झालेल्या आझादी एक्स्प्रेसमुळे १८ सेवांची वाढ होणार आहे. आझादी एक्स्प्रेसमुळे १५४ असलेल्या मेट्रो सेवा आता १७२ होतील. त्यामुळे दर १२ मिनिटाला धावणारी मेट्रो आता दर १० मिनिटांनी धावेल. ज्यामुळे निश्चितच प्रवाशांचा वेळ वाचेल.