भुयारी मेट्रोतून थेट जा विमानतळावर! आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २ पासून वॉकवे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 10:39 AM2024-11-28T10:39:09+5:302024-11-28T10:41:03+5:30
आरे ते बीकेसी या मेट्रो ३ मार्गिकेवरील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ स्थानकावरून विमानतळावर जाण्यासाठी थेट कनेक्टिव्हिटी नाही.
मुंबई :
आरे ते बीकेसी या मेट्रो ३ मार्गिकेवरील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ स्थानकावरून विमानतळावर जाण्यासाठी थेट कनेक्टिव्हिटी नाही. परिणामी मेट्रो ३ मार्गिकेवरून विमानतळावर पोहोचण्यासाठी प्रवाशांना अर्ध्या किलोमीटरची पायपीट करावी लागते. यावर तोडगा काढण्यासाठी मेट्रो ३ मार्गिका ते विमानतळ, असा तात्पुरता वॉकवे उभारण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
मेट्रो ३ मार्गिकेचा आरे ते बीकेसी हा १२.६९ किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. या मार्गिकेमुळे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल १ आणि टर्मिनल २ जोडले गेले आहेत. मात्र, सध्या मेट्रो ३ मार्गिकेच्या टर्मिनल २ या स्थानकातून बाहेर पडल्यावर प्रवाशांना रस्ता ओलांडून टर्मिनल २ कडे चालत जावे लागते. हे अंतर जवळपास अर्धा किलोमीटर असून, त्या प्रवासासाठी जवळपास १० ते १२ मिनिटे लागतात. एवढे अंतर चालणे ज्येष्ठ नागरिकांना शक्य नाही. त्यामुळे मेट्रो ३ मार्गिका आणि विमानतळ यांना थेट जोडण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या मार्गाचे काम लवकर पूर्ण करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात होती.
मेट्रो ३ मार्गिकेवरून विमानतळावर थेट जाण्यासाठी नवा मार्ग उभारण्याच्या अनुषंगाने नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांच्यासह एमएमआरडीए, एमएमएमओसीएल आणि एमआयएएल यांच्या अधिकाऱ्यांनी मेट्रो ३ चे टर्मिनल २ स्थानक आणि विमानतळाला भेट दिली.
एमएमआरडीए करणार काम
एमआयएएलकडून विमानतळ ते मेट्रो ३ असा भुयारी मार्ग प्रस्तावित आहे. मात्र या मार्गाचे काम सुरू झालेले नाही. तसेच मेट्रो ३ मार्गिका आणि विमानतळ यांच्यादरम्यान गुंदवली ते विमानतळ मेट्रो ७ अ मार्गिकेचे स्थानक येणार आहे.
सद्य:स्थितीत या स्थानकाचे काम सुरू आहे. त्यामुळे विमानतळ ते मेट्रो ३ मार्गिकेच्या भुयारी मार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात मेट्रो ३ ते विमानतळ, असा वॉकवे उभारण्याचे प्रस्तावित आहे.
मेट्रो ७ मार्गिकेवरून हा वॉकवे जाणार असल्याने त्याची उभारणी लवकरच एमएमआरडीएकडून केली जाणार आहे. या भेटीत एमएमआरडीएला तसे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांनी दिली.