लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : तांत्रिक व आर्थिक गर्तेत सापडल्यामुळे ३ मे पासून जमिनीवर असलेल्या गो-फर्स्ट कंपनीने पुन्हा एकदा उड्डाणासाठी तयारी सुरू केल्याचे वृत्त असून, याकरिता कंपनीने एक प्रस्ताव नागरी विमान महासंचालनालयाकडे (डीजीसीए) सादर केल्याचे समजते. कंपनीच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आणि कंपनीच्या नियोजनानुसार आर्थिक स्रोत उपलब्ध करणे जर कंपनीला शक्य झाले तर येत्या पाच महिन्यांत २२ विमानांचे उड्डाण करण्याचा कंपनीचा मानस आहे.
उपलब्ध माहितीनुसार, आगामी पाच महिन्यांत २२ विमानांच्या माध्यमातून दिवसाकाठी १५२ फेऱ्या कंपनी करू शकते. ही सेवा देण्याकरिता कंपनीच्या ताफ्यात सध्या ६७५ वैमानिक व १,३०० क्रू कर्मचारी आहेत. १५२ फेऱ्यांकरिता हा कर्मचारी वर्ग पुरेसा असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. या नियोजनानुसार कंपनीला सेवा सुरू करायची असेल तर कंपनीला २०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. मात्र, केंद्र सरकारच्या इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी योजनेअंतर्गत ४०० कोटी रुपये कंपनीला मिळू शकतात. त्यामुळे ही सेवा सुरू करणे शक्य असल्याचा दावा केला जात आहे.
३ मे रोजी कंपनीची विमाने जमिनीवर स्थिरावण्यापूर्वी कंपनीच्या ताफ्यात ५२ विमाने होती. या माध्यमातून कंपनी दिवसाकाठी २०० फेऱ्या करत होती. यापैकी २६ विमानांच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ती जमिनीवर होती. त्यानंतर कंपनीची आर्थिक स्थिती देखील दोलायमान झाली आणि नंतर कंपनीने दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केला. ऐन सुट्यांच्या मोसमात कंपनीची सेवा बंद पडल्याचा फटका ग्राहकांना बसला आहे.