Join us  

गो-फर्स्टची आणखी २० विमाने लवकरच जमिनीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2023 6:31 AM

विमान कंपनीचे चाक आणखी रुतणार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आर्थिक दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केलेल्या गो-फर्स्टला आता आणखी एक दणका बसण्याची शक्यता आहे. कंपनीला ज्या कंपन्यांनी त्यांची विमाने भाडेतत्त्वावर दिली आहेत त्या कंपन्यांनी या विमानांची नोंदणी रद्द करावी, अशी मागणी नागरी विमान महासंचालनालयाकडे (डीजीसीए) केली आहे. हा निर्णय झाल्यास कंपनीची आणखी २० विमाने उड्डाण करू शकणार नाहीत. असे झाल्यास पुन्हा विमान उड्डाणाचे कंपनीचे स्वप्न भंगणार आहे.  पुढील आठवड्यामध्ये यासंदर्भात निर्णय अपेक्षित आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सध्या कंपनीच्या ताफ्यात एकूण ५० विमाने आहेत. मात्र, विमानाच्या इंजिनमध्ये झालेल्या बिघाडानंतर कंपनीची एकूण २५ विमाने देशातील विविध विमानतळांवरच उभी आहेत. त्यात आता कंपनीला ज्यांनी भाडेतत्त्वावर विमाने दिली त्यांनी त्यांच्या नोंदणीची मागणी केली आहे. कंपनीने एकूण २० विमाने भाडेत्त्वावर घेतली आहेत. ही नोंदणी रद्द करण्यास जर डीजीसीएने मान्यता दिली तर कंपनीची ५० पैकी ४५ विमाने जमिनीवर असतील आणि केवळ पाचच विमाने उड्डाण करू शकतील. आधीच आर्थिक गर्तेत अडकलेल्या कंपनीला या निर्णयामुळे मोठा फटका बसेल आणि पुन्हा कंपनीला व्यवसाय करणे अशक्य होईल, असे मत विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

ग्राहकांचे पैसे परत करा

गो-फर्स्टच्या विमानाने प्रवास करण्यासाठी ज्या ग्राहकांनी आगाऊ बुकिंग केले आहे, अशा सर्व ग्राहकांचे पैसे विहित मुदतीमध्ये परत करा, असे निर्देश डीजीसीएने कंपनीला दिले आहेत. तर, १५ मे पर्यंतची तिकीट विक्री कंपनीने बंद केली असून ग्राहकांना रिफंड देण्यासंदर्भातही काम करत असल्याचे कंपनीने डीजीसीएला कळविले आहे.

टॅग्स :व्यवसाय