‘गो ग्रीन’साठी तरुणाई सरसावली
By admin | Published: June 5, 2016 03:16 AM2016-06-05T03:16:51+5:302016-06-05T03:16:51+5:30
जागतिक पर्यावरण दिनापुरतीच निसर्गाविषयीची कळकळ वाटण्यापेक्षा ती आयुष्यभर असायला हवी, असे तंत्रज्ञानाच्या युगातील तरुणाईला वाटते. म्हणूनच निसर्गाच्या संवर्धनासाठी आजची तरुणाई
मुंबई : जागतिक पर्यावरण दिनापुरतीच निसर्गाविषयीची कळकळ वाटण्यापेक्षा ती आयुष्यभर असायला हवी, असे तंत्रज्ञानाच्या युगातील तरुणाईला वाटते. म्हणूनच निसर्गाच्या संवर्धनासाठी आजची तरुणाई पुढे सरसावली आहे आणि आपल्या कामातूनच ‘पर्यावरण’ संवर्धनाचा त्यांनी चंग बांधला आहे. महत्त्वाचे म्हणजे अधिकाधिक तरुणांना एकत्रित करण्यासाठी ‘जागतिक पर्यावरण दिना’च्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन तरुणाईने ‘गो ग्रीन’चा संदेश दिला असून, याच निमित्ताने ‘लोकमत’च्या रामेश्वर जगदाळे व अपर्णा जगताप यांनी या उपक्रमांचा घेतलेला आढावा.
हिरवेगार कॅम्पस
विद्याविहार पूर्वेकडील सोमय्या महाविद्यालयाच्या कॅम्पसमधील हिरवाई विद्यार्थी मित्रांचा आधार ठरली आहे. येथे वेगवेगळ्या प्रकारची ३००हून अधिक झाडे असून, यात वाढ करण्याचा तरुणाईचा मानस आहे. पाणीटंचाई लक्षात घेत महाविद्यालयाने रेन वॉटर हार्वेस्टिंगचा महत्त्वपूर्ण प्रकल्प कॅम्पसमध्ये उभारला आहे.
या प्रकल्पाद्वारे जमा झालेले पाणी संपूर्ण महाविद्यालयाला पुरविले जाते. पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठीही यंत्रणा बसवण्यात आली आहे. प्रक्रिया केलेले पाणी झाडांसाठी वापरण्यात येते. विशेष म्हणजे विज्ञान प्रयोगातून निघणारे रसायनमिश्रित पाणीदेखील प्रक्रिया करून पुन्हा वापरले जाते. कॅम्पसमध्ये एखादे झाड मृत झाले तर त्या जागी लगेच दुसरे झाड लावले जाते.
झाडे लावणारच
पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती करण्यासाठी परळ येथील महर्षी दयानंद महाविद्यालयातर्फे झाडे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यावरणाचा होणारा ‘ऱ्हास’ याविषयी चर्चा करण्यापेक्षा हा ऱ्हास थांबवण्यासाठी झाडे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाविद्यालयाचे एनएनएस युनिट यंदा बदलापूर येथील दहिवली परिसरातील धामनपाडी व भूज गावात वृक्षारोपण करणार आहे.
नद्या तर स्वच्छ करणारच
‘रिव्हर मार्च’ या संस्थेने महाविद्यालयीन तरुणाईच्या मदतीने पुढाकार घेतला आहे. मागील वर्षभरापासून ओशिवरा, पोईसर, दहिसर आणि मिठी या चार नद्यांच्या स्वच्छतेचा निर्धार संस्थेने केला आहे. मुंबईकरांना पर्यावरणाची माहिती देताना त्यांना किमान नद्यांची माहिती व्हावी याकरिता संस्थेने सुरुवातीला दहिसर नदीवर माहितीपट बनवला. माहितीपटातून नदीची पूर्वस्थिती, सद्य:स्थिती व काळजी न घेतल्यास होणारी स्थिती चित्रित केली.
शिवाय शाळाशाळांत, महाविद्यालयांत यासंबंधीचे कार्यक्रम घेत सुमारे २ हजार ५०० विद्यार्थी पर्यावरणीय चळवळीशी जोडण्यात आले. या माध्यमातून आता दहिसर नदी दर रविवारी स्वच्छ केली जाते. नदीत सांडपाणी सोडण्यात येऊ नये म्हणून संस्था जोमाने काम करत आहे.
दहिसरसह ओशिवरा, मिठी व पोईसर या नद्यांच्या स्वच्छतेसाठीही संस्थेतर्फे मोहीम हाती घेण्यात आली आहे.
सर्वांत महत्त्वाची बाब ही की, या मोहिमेला जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांनी सहकार्य केले आहे. ते स्वत: या मोहिमेत सहभागी झाले आहेत. नद्यांची स्वच्छता मोहीम सुरू असतानाच २४ एप्रिल रोजी हाती घेण्यात आलेल्या दहिसर नदीच्या स्वच्छतेच्या माध्यमातून या नदीतून ३ हजार किलो प्लॅस्टिक काढण्यात आले.
‘निसर्ग’ कॅमेऱ्यात टिपायला मला खूप आवडते आणि मी टिपलेली छायाचित्रे पोस्ट करायलासुद्धा आवडते, पण या पोस्ट करण्यामागे नुसते ‘लाइक्स’ मिळवण्याचा हेतू नसतो; तर त्यातून निसर्गाचे वेड इतरांना लागावे हा छुपा उद्देश असतो. सध्या राज्यात दुष्काळ आहे. छायाचित्रातील दुष्काळ पाहून निसर्ग आपल्याकडे मदत मागत असल्याचा भास होतो. आता तरी निसर्गाचाच्या संवर्धनासाठी आपण एकत्रित पावले उचलायला हवी.
- अभिषेक साटम, छायाचित्रकार, महर्षी दयानंद महाविद्यालय, परळ
अन्नसाखळीतील प्राण्यांची संख्या कमी झाली तर संपूर्ण अन्नसाखळी विस्कळीत होऊ शकते हे माहीत असूनही आपण प्राण्यांना इजा पोहोचवतो. मानवाने निसर्गात हस्तक्षेप करायचा आणि त्या ठिकाणी प्राणी आला की, स्वत:च्या सुरक्षेसाठी त्या मुक्या प्राण्याचा बळी द्यायचा, हे योग्य नाही. आपण वाढत्या लोकसंख्येसाठी झाडांची कत्तल केली. आता तरी भरपूर झाडे लावून प्राण्यांना त्यांचा निवारा मिळवून देऊ या.
- तेजस औटी, सर्पमित्र, मुंबई विद्यापीठ
मोबाइल, कॉम्प्युटरमध्ये गुंतून राहिलेल्या तरुणांनी एकदा तरी निसर्गाचा आस्वाद घ्यावा. मी चित्रकार आहे. रंग जसे एकमेकांत मिसळतात. तसे आपण निसर्गाशी एकरूप झालो की, निसर्गही आपल्याला सामावून घेतो. मला निसर्गाची विविध रूपे रेखाटायला आवडतात. चांगल्या चित्रांसाठी मी खूप फिरतो. कधी नयनरम्य निसर्गाचे दर्शन होते तर कधी विद्रूप निसर्गाचे दर्शन होते. ज्याने मन विषण्ण होते. माझ्या निसर्गचित्रांमधून आता तरी साऱ्यांना निसर्गाची ओढ लागावी, अशी अपेक्षा आहे.
- अमोल कुटे, चित्रकार, महर्षी दयानंद महाविद्यालय, परळ
मानवाच्या गरजा पूर्ण करताना निसर्गाचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वन्यजीव संशोधक असल्यामुळे प्राण्यांच्या अवयवांची तस्करी याविषयी अनेकदा संशोधन केले आहे. जंगलांवर अतिक्रमण करून प्राण्यांच्या घरांवर मानवाने गदा आणली. देशातील वन्यजिवांच्या संख्येत वाढ करण्यासाठी शिकारींवर निर्बंध आणायला हवेत. आता प्राणिसंग्रहालयात प्राणी पाहायला मिळत नाहीत. वाघ, सिंह हे प्राणी आताच्या पिढीने तर पुस्तकातच पाहिले असतील, असे वाटते. दिवसेंदिवस प्राण्यांच्या संख्येत घट होत आहे. प्राण्यांच्या संवर्धनसाठी आता तरी आपण पावले उचलायला हवीत. नाहीतर प्राणी नष्ट होतील आणि निसर्गचक्र मोडून पडेल.
- सदाफ कडवेकर, वन्यजीव संशोधक