Join us

स्वमग्न मुलाच्या घरी जाऊन प्रक्रिया पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 4:48 AM

अमेरिकेच्या नागरिकाला १२ वर्षांच्या स्वमग्न मुलाला दत्तक घेण्याची परवानगी देत उच्च न्यायालयाने पासपोर्ट कार्यालयाला मुलाचा पासपोर्ट तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व औपचारिकता

मुंबई : अमेरिकेच्या नागरिकाला १२ वर्षांच्या स्वमग्न मुलाला दत्तक घेण्याची परवानगी देत उच्च न्यायालयाने पासपोर्ट कार्यालयाला मुलाचा पासपोर्ट तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व औपचारिकता त्याच्या घरी जाऊन पूर्ण करण्याचा आदेश दिला.एकोणसाठ वर्षीय अमेरिकन महिलेने १२ वर्षांच्या स्वमग्न मुलाला कायदेशीररीत्या दत्तक घेण्यासाठी केलेल्या याचिकेवर न्यायालयाने वरील आदेश दिला.सेंट्रल अ‍ॅडॉप्शन रिसोर्स आॅथॉरिटीच्या (कारा) नियमांनुसार, एखाद्या परदेशी व्यक्तीला भारतीय मुलाला दत्तक घ्यायचे असेल तर त्यासाठी उच्च न्यायालयाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार अमेरिकन महिलेले स्वमग्न मुलाला दत्तक घेण्यास परवानगी देत न्यायालयाने म्हटले की, पासपोर्ट काढण्यासाठी आवश्यक असलेल्या औपचारिकता पूर्ण करण्याकरिता मुलाला पासपोर्ट कार्यालयात जाणे शक्य नाही.अर्ज प्रक्रिया पार पडेपर्यंत पासपोर्ट कार्यालयात प्रतीक्षा करणे, मुलाला शक्य नाही. ही विशेष केस असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी मुलाच्या घरी जाऊन औपचारिकता पूर्ण करावी, असा आदेश न्यायालयाने दिला. सध्या मुलगा अमेरिकन महिलेबरोबर ठाण्यात राहत आहे. याचिकेनुसार, मुलगा बिहारमध्ये जन्मला असून त्याला ठाण्याच्या रुग्णालयात कोणीतरी सोडले होते. रुग्णालयाने याबाबत पोलिसांना माहिती दिली. मात्र, त्याच्या पालकांचा शोध लावण्यात पोलिसांना अपयश आले. मुलाचा तात्पुरता ताबा याचिकाकर्तीला देण्यात आला. त्यानंतर महिलेने मुलाचा कायदेशीर ताबा मिळविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली.