Join us

अन्य शहरांत जा, तशी स्वच्छता मुंबईत करा; अतिरिक्त आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2023 12:29 PM

मुंबईतील समस्यांबाबत अतिरिक्त आयुक्त शिंदे यांनी सोमवारी बैठक घेऊन कचऱ्यासंदर्भात मुंबईतील इतर नियोजन प्राधिकरणांसमवेत समन्वय साधण्यासाठी बैठक घेण्याची सूचना केली.

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी पालिका प्रशासनाला कचऱ्याच्या मुद्द्यावरून फैलावर घेतल्यानंतर पालिका प्रशासनाकडून मुंबईतील कचरा व्यवस्थापनासाठी बैठकांवर बैठका होत आहेत. कचऱ्याच्या तक्रारींसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ‘स्वच्छ मुंबई’ व्हॉट्सॲप तक्रार नोंदणीसाठी सुरू केल्यानंतर याच धर्तीवर रोजच्या कचऱ्यावर देखरेखीसाठी स्वतंत्र ॲप विकसित करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. याशिवाय स्वच्छतेसाठी लौकिक असलेल्या शहरांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांचे यशस्वी प्रकल्प, धोरणे, कार्यपद्धती, तंत्रज्ञान यांचा अंगीकार कसा करता येईल याची चाचपणी करून माहिती घेण्याच्याही सूचना शिंदे यांनी केल्या आहेत.

मुंबईतील समस्यांबाबत अतिरिक्त आयुक्त शिंदे यांनी सोमवारी बैठक घेऊन कचऱ्यासंदर्भात मुंबईतील इतर नियोजन प्राधिकरणांसमवेत समन्वय साधण्यासाठी बैठक घेण्याची सूचना केली. तसेच या बैठकीत कचऱ्याच्या तक्रारी सोडविण्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना कराव्यात यासाठी प्राथमिक रूपरेषा ठरविली. कचऱ्यासाठी आराखडा तयार करण्याच्या आणि लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टीने अभियान राबविण्याच्या  सूचना शिंदे यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. कचरा वर्गीकरण, रोजची कचरा संकलनाची कार्यपद्धती यामध्ये सुधारणा इत्यादी विषयांवर कनिष्ठ अवेक्षक यांना प्रशिक्षण देणे, प्रगत परिसर व्यवस्थापन, रहिवासी कल्याण संघटना यासारख्या संकल्पनांना अधिक बळ देण्याची गरज शिंदे यांनी व्यक्त केली. शिवाय अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सहकार्याने मुंबईतील बिगर सरकारी संस्थांचा कचरा व्यवस्थापन कार्यपद्धतीमध्ये सहभाग वाढवावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

अधिकारी रोज २ तास पाहणी करणार

महापालिका आयुक्तांच्या सूचनांनंतर पालिकेच्या घनकचरा विभागाने परिपत्रक काढून सात परिमंडळांमधील स्वच्छतेवर देखरेख ठेवण्यासाठी सात अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. या अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एकदा सकाळी ९ ते ११ या वेळेत नेमून दिलेल्या परिमंडळात फिरून स्वच्छतेची कामे नीट होत आहेत की नाही याची पाहणी करावी. महापालिका आयुक्तांच्या सूचनांनंतर पालिकेच्या घनकचरा विभागाने परिपत्रक काढून सात परिमंडळांमधील स्वच्छतेवर देखरेख ठेवण्यासाठी सात अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. या अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एकदा सकाळी ९ ते ११ या वेळेत नेमून दिलेल्या परिमंडळात फिरून स्वच्छतेची कामे नीट होत आहेत की नाही याची पाहणी करावी. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाएकनाथ शिंदे